फेसबुक पोस्टवरून ठाकरे समर्थकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुक पोस्टवरून ठाकरे समर्थकाला अटक
फेसबुक पोस्टवरून ठाकरे समर्थकाला अटक

फेसबुक पोस्टवरून ठाकरे समर्थकाला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : सोशल मीडियावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे फोटो अपलोड करीत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याची उद्धव ठाकरे समर्थक शशांक माणगावकर याच्याविरोधात शिंदे समर्थकांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना शाखांवरून सध्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. आता सोशल मीडियावरील पोस्टवरून शिंदे व ठाकरे समर्थक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात शिंदे समर्थक तथा उपशहरप्रमुख संतोष चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. ४) रात्री उशिरा शशांक माणगावकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार शशांक याने फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतात काम करत असताना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कौटुंबिक फोटो अपलोड करत त्यासोबत बदनामीकारक मजकूर पोस्ट केला आहे. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे दोन्ही गटांत वाद होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.