अनहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल
अनहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

अनहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

कासा (पालघर), ता. ५ (बातमीदार) : उद्योगपती सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी अनहिता पंडोले (५५, रा. कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई) यांच्याविरोधात कासा पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातावेळी अनाहिता कार चालवत होत्या; मात्र सूर्या नदीवरील पुलाजवळ तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये कार वळवण्यात अपयश आल्याने हा अपघात झाल्याची माहिती दरायस पंडोले यांनी पोलिस जबाबात दिली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ४ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घोळ गावाच्या हद्दीत सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला मर्सिडिझ कार धडकून हा अपघात झाला होता. या अपघातात जहांगीर पंडोल, सायरस मिस्त्री या दोघांचा मृत्यू; तर डरायस पंडोल, अनाहिता पंडोल हे जखमी झाले होते. या अपघातप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वसईतील प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुण्यातील मर्सिडिझ बेंझ इंडिया कंपनीकडून कारची तांत्रिक तपासणी करून अहवाल प्राप्त झाला होता.

कारचालक डॉ. अनहिता पंडोले यांनी आपल्या ताब्यातील कार हयगयीने भरधाव वेगात चालवून धोकादायकरीत्या ओव्हरटेक करून सूर्या नदीच्या कठड्याला धडक दिल्याचे अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी करीत आहेत.