किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला विरोध
किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला विरोध

किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला विरोध

sakal_logo
By

मनोर, ता. ५ (बातमीदार) : किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण सोहळ्यात बोलताना दिली; मात्र मच्छीमारांचा विरोध असताना किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मंजुरीची री मुख्यमंत्र्यांनी ओढल्याने मच्छीमार बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढवण बंदरानंतर आराखड्याबाबत विरोधाची धार निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकीकडे बरीच वर्षे समुद्र किनाऱ्यावरील कोळी वाड्यांमधील मच्छीमारांच्या घरांचे, तसेच मासे सुकवण्याच्या जागांचे सात-बारा उतारे नावे करून देण्याची मागणी केली जात आहे; मात्र याबाबत कोणत्याच हालचाली केल्या गेल्या नाहीत. किनारपट्टीवरील वेगवेगळ्या जमिनी, वस्त्या, गावे, नदी, खाडी, मिठागरे, गावठाण जमिनी, कांदळवन, खारफुटी जमीन, पाणथळ जमिनी व त्याच्या नोंदी आराखड्यात येणार असल्याने मच्छीमारांसाठी आराखडा महत्त्वाचा आहे. प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडाबाबत ई जनसुनावणी रेटण्यात आली होती. मच्छीमार समाजाच्या मागण्या मान्य न करता राज्य सरकारकडून किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिल्याने मच्छीमार समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी सीआरझेडची मर्यादा ५०० मीटरवरून ५० मीटर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यात मच्छीमार समाजाच्या मागण्यांना स्थान देण्यात आले नाही. येत्या २१ तारखेला आझाद मैदानात मच्छीमार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
- जयकुमार भाय, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संस्था