नवाब मलिकांची मालमत्ता जप्त होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिकांची मालमत्ता जप्त होणार
नवाब मलिकांची मालमत्ता जप्त होणार

नवाब मलिकांची मालमत्ता जप्त होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची परवानगी न्यायप्रणाली प्राधिकरणाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिली आहे. यामध्ये गोवाला कम्पाऊंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेला तीन सदनिका, वांद्रे पश्चिमेतील दोन सदनिका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करत आहेत.

गँगस्टर दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. या मालमत्ता मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिड्‍स इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित आहेत. मलिक न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, सरदार खान आणि नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील गोवाला कम्पाऊंडमधील एका महिलेची तीन एकर जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या गुन्हेगारी कटात सहभाग घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

मलिकांवरील आरोप काय?
मुनिरा प्लंबर यांनी १९९९ मध्ये सलीम पटेल यांच्या नावे ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ जारी केली होती. तिच्या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या समस्येवर वाटाघाटी करून त्यावर तोडगा काढण्यात आला होता. त्याऐवजी सलीम पटेलने हसीना पारकर यांना कम्पाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे कब्जा करण्यास मदत केली. दरम्यान, सलीम यांच्यावर मुखत्यारपत्राचा गैरवापर केल्याचा आणि हसिना पारकरच्या सूचनेनुसार गोवाला मालमत्ता मलिकांच्या सॉलिड्‍स इन्व्हेस्टमेंट्स कंपनीला विकल्याचा, तसेच मलिक यांनी कुर्ला आणि वांद्रे येथे पाच सदनिका आणि उस्मानाबादमधील शेतजमीन गोवाला कम्पाऊंडमधून मिळालेल्या उत्पन्नातून खरेदी केल्याचा आरोप आहे.