वहाळ गावातील १०० घरांना तडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहाळ गावातील १०० घरांना तडे
वहाळ गावातील १०० घरांना तडे

वहाळ गावातील १०० घरांना तडे

sakal_logo
By

उरण, ता. ६ (वार्ताहर) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर बोर ब्लास्टिंग केली जाते. या बोर ब्लास्टींगमुळे भुंकपासारखे हादरे बसत असल्याने वहाळ गावातील सुमारे १०० घरांना तडे गेले आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ब्लास्टींग बंद झाले नाहीतर विमानतळाचे कामकाज बंद करण्याचा इशारा वहाळ ग्रामपंचायतीने सिडकोला दिला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी येथील गावांचे स्थलांतरित करून सपाटीकरणाचे जोरदार काम सुरू आहे. डोंगर, टेकड्यांचे सपाटीकरण करण्यासाठी बोर ब्लास्टींगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे ठेकेदार अदानी इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा विभागाने कंट्रोल ब्लॉस्ट करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मात्र, दुपारच्या वेळेस होणाऱ्या या ब्लास्टींगमुळे जवळच असणाऱ्या
वहाळ गावातील घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसू लागले आहेत. या हादऱ्यांमुळे गावातील जवळपास १०० घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, वहाळ गावातील रहिवासी केसरीनाथ दापोळकर यांच्या आरसीसी घराच्या कॉलमला देखील तडे गेल्याने जीवमुठीत धरुनच ग्रामस्थांना राहावे लागत आहे.
--------------------------------
मुलांना दुसऱ्या गावात पाठवण्याची वेळ
घराला तडे गेल्यामुळे अनेकांनी लहान मुलांना दुसऱ्या गावातील घरी पाठवले आहे. तर आशाबाई दापोळकर या विधवा महिलेच्या घराला देखील तडे गेले गेल्याने आर्थिक ओढाताण करून बांधलेल्या घरात दोन मुलांसह रहावे लागत आहे. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बोर ब्लास्टींगमुळे जिवितहानी होण्याच्या भीती व्यक्त केली जात आहे.
--------------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी बोर ब्लास्टींग केली जात आहे. या ब्लास्टिंगमुळे वहाळ गावातील घरांना हादरे बसत आहेत. अनेकांच्या घरांना तडेही गेले आहेत. त्यामुळे जिवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत सिडकोच्या एअरपोर्ट विभाग व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
-पुजा पाटील, सरपंच, वहाळ
-----------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सपाटीकरणासाठी होत असलेल्या ब्लास्टींगची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांना सुचना दिल्या आहेत.
़़-राहुल मुंडके, प्रांत अधिकारी