गटातटाचे राजकारण करणाऱ्‍यांना पक्षात स्थान नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटातटाचे राजकारण करणाऱ्‍यांना पक्षात स्थान नाही
गटातटाचे राजकारण करणाऱ्‍यांना पक्षात स्थान नाही

गटातटाचे राजकारण करणाऱ्‍यांना पक्षात स्थान नाही

sakal_logo
By

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर भारतीय जनता पक्षात गटातटाचे राजकारण करणारे नेते व कार्यकर्ते यांना पक्षात स्थान नाही. जो पक्षाच्या सिद्धांतावर चालतो तोच पक्षात टीकेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिरा रोड येथे दिला. मिरा-भाईंदर भाजपमध्ये सुरू असलेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी दिलेला हा इशारा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र याआधीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देखील असा इशारा पूर्वी दिला होता. मात्र त्याचा कोणताही परिणाम गटबाजीवर झाला नसल्यामुळे यावेळी तरी या इशाऱ्याचा परिणाम होणार का, असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
मिरा-भाईंदर भाजपमध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांचे स्वतंत्र गट आहेत. मेहता यांच्यासोबत भाजपच्या माजी नगरसेवकांचा व कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे; तर राज्यातील सत्तांतरादरम्यान पुन्हा भाजप गोटात सामील झालेल्या अपक्ष आमदार गीता जैन या रवी व्यास गटात सहभागी झाल्या आहेत. मेहता गटाला रवी व्यास यांचे नेतृत्व मान्य नसल्याने मेहता गटाकडून व्यास यांच्या कार्यक्रमावर दरवेळी अघोषित बहिष्कार टाकला जातो. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती, पण गटातटाच्या राजकारणामुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटबाजी संपवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाचे मनोमिलन घडवून पक्षातील गटबाजी संपुष्टात आली असल्याचे घोषित केले होते, पण ही घोषणा अल्पावधीतच फोल ठरल्याचे दिसून आले.
..
गटबाजी पुन्हा उघड
दोन्ही गटांतून सध्या विस्तवही जात नाही असेच चित्र आहे. रविवारी प्रदेशाध्यक्षांचे शहरात स्वागत करण्यासाठी लावलेल्या फलकांवरून पक्षातील गटबाजी पुन्हा उघड झाली. मेहता गटाने लावलेल्या फलकांवर जिल्हाध्यक्ष रवी व्यास व आमदार गीता जैन यांना स्थान देण्यात आलेले नाही; तर रवी व्यास गटाकडून लावण्यात आलेल्या फलकांवरून माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे छायाचित्र वगळण्यात आले आहे. या गटबाजीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून नेमक्या कोणत्या गटाबरोबर जायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

योग्य वेळी उत्तर मिळेल
पक्षातील गटबाजी संदर्भात आपल्याकडेही तक्रारी आल्या आहेत. पक्षापुढे कोणीही मोठा नाही. गटबाजी कारणाऱ्‍यांना योग्य वेळी उत्तर मिळेल. पक्षाकडून सर्वच लोकांच्या कार्याचे लेखापरीक्षण केले जाते, जो पक्षाची शिस्त मोडेल त्याच्याबाबत निवडणुकीच्या काळात पक्ष योग्य निर्णय घेईल. निवडणुकीत उमेदवारी देताना प्रत्येक जागेसाठी तीन संभाव्य उमेदवारांची निवड केली जाईल. त्यापैकी जनतेच्या मनात नेमका कोण उमेदवार आहे याचे पक्षाकडून सर्वेक्षण केले जाईल आणि नंतर थेट प्रदेश कार्यालयाकडून योग्य उमेदवाराला एबी फॉर्म दिला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

स्थानिक नेते एकत्र येणार का ?
याआधी देखील भाजपमधील गटबाजी संपवण्याचे प्रयत्न झाले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा गटबाजी संपवण्याचा इशारा दिला आहे. मात्र स्थानिक पातळीवरील नेते वैयक्तिक प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेवून एकत्र येणार का, असाच प्रश्न भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.