पोलिस वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळले
पोलिस वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळले

पोलिस वसाहतीत पुन्हा स्लॅब कोसळले

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः पोलिसांच्या घाटकोपर येथील दक्षता हाऊसिंग सोसायटीतील अनेक इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे छत कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. या आठवड्यात अशा तीन घटना घडल्या असून काल (ता. ५) मध्यरात्री दोन वाजता येथील गोदावरी क्रमांक १ या इमारतीतील एका रूमचे छत कोसळून त्यात ज्योती म्हसणे आणि मानव शाह हे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत म्हाडा तसेच पालिकेला पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याने आता येथील शेकडो पोलिस कुटुंबे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे पदाधिकारी दशरथ आव्हाड यांनी दिली.

आंदालनाची तयारी
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली छताचे प्लास्टर कोसळण्याची मालिका अद्याप थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सलग दोन दिवस राहत्या इमारतीतील छताचे प्लास्टर कोसळले आहे. त्यामुळे येथे राहत असलेल्या पोलिस पत्नी आता पालिका आणि म्हाडा कार्यालयावर आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्घटनांची मालिका
घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरात ही जवळपास २३ इमारतींची पोलिस वसाहत आहे. १९९६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या या वसाहतीतील अनेक इमारती या गेल्या वर्षभरापासून मोडकळीस आलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात येथील काही इमारतींचे तब्बल १२ वेळा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात येथील गणेश बिल्डिंगमधील रूम नंबर आठमध्ये बाळासाहेब काकड यांच्या या रूममधील स्लॅब कोसळले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा गोदावरी इमारतीतील घराचे छत कोसळून दोघे जण जखमी झाले आहेत.

पंतनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पालिकेचे अधिकारी पाठवून याबाबतची महिती घेणार असून, पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
– संजय सोनावणे, सहायक आयुक्त, एन विभाग

सर्व इमारती धोकादायक
येथील सर्व इमारती या मोडकळीस आल्याने आणि त्यांवर म्हाडा, पालिका तसेच संबंधित यंत्रणांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत. याबाबत उपाययोजना करावी म्हणून रहिवासी सतत पालिका आणि म्हाडा उपनिबंधक कार्यालयात हेलपाटे घालत आहेत; मात्र एकही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप ठोस पाऊले उचलली नाहीत, असा आरोप पदाधिकारी अजय बोडके, रवी दक्षता, रमेश दराडे, मनोज फराटे, संतोष नागरे, रुक्मिणी वारे, अशोक सांगळे, संतोष, गणेश पालवे यांनी बोलताना केला आहे.