मनमानी भाडेवसुलीला अभय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनमानी भाडेवसुलीला अभय
मनमानी भाडेवसुलीला अभय

मनमानी भाडेवसुलीला अभय

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. ६ ः कळंबोली परिसरामध्ये मीटरप्रमाणे रिक्षा धावत नाहीत. त्यामुळे मनाला वाटेल तितके भाडे रिक्षाचालक आकारत आहेत. विशेष म्हणजे रिक्षाचालकांच्या या मनमानीविरोधात परिवहन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी मात्र वेठीस धरला जात आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे अंतर्गत प्रवाशांची संख्यासुद्धा जास्त आहे. एनएमएमटीच्या काही सेवा सुरू झाल्या असल्या तरी अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी रहिवाशांना तीन आसनी रिक्षांवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेऊन रिक्षाचालकांकडून अवास्तव भाडे आकारण्याचे प्रकार सुरू आहेत. कळंबोलीमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा चालत नसल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या कारवायांपासून वाचण्यासाठी फक्त मीटरचा वापर केला जातो; परंतु सातत्याने त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय कळंबोलीमध्ये प्रवासी संघटना नसल्याने रिक्षाचालकांचे फावत असून रिक्षाचालक आणि मालक संघटित असल्याने प्रवाशांवर अरेरावीचे प्रकार घडत आहेत.
--------------------------------
रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूट
कळंबोली कॉलनीमध्ये महामार्गावर पुण्याकडून येणारे प्रवासी उतरतात. एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सने ते प्रवासी प्रवास करतात. बस थांब्यावर उतरल्यानंतर प्रवाशांकडून अवास्तव भाडे रिक्षाचालक आकारात आहेत. रात्रीच्या वेळेस प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेऊन अवास्तव भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
------------------------------
हद्दीच्या वादामुळे खतपाणी
कळंबोली वसाहतीमध्ये बाहेरून आलेल्या रिक्षाचालकांना परतीचे प्रवासी भाडे घेण्यासाठी स्थानिक रिक्षावाले मनाई करतात. आमच्या हद्दीमध्ये आम्हीच व्यवसाय करणार, अशी भूमिका स्थानिक रिक्षाचालकांची आहे. त्याचबरोबर रिक्षा थांब्यांवर इतर रिक्षाचालकांना उभे राहू दिले जात नसल्यामुळे अतिरिक्त भाडे आकारण्याच्या प्रकाराला खतपाणी मिळत आहे.
-----------------------------------
अबोली रिक्षांवर पुरुष चालक
महिलांच्या सबलीकरणासाठी अबोली रिक्षा ही संकल्पना परिवहन विभागाने सुरू केली आहे. यासाठी परवाने दिले आहेत; परंतु या रिक्षांवर व्यवसाय करणारे अधिकतर पुरुष चालक किंवा अल्पवयीन मुले असल्याने या संकल्पनेलाच हरताळ फासला गेला आहे. विशेष म्हणजे, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
------------------------------
मीटरवर रिक्षा चालवणे हा नियम सर्वत्र लागू आहे; परंतु अशा प्रकारे जर ग्राहकांना वेठीस धरले जात असेल तर त्यांनी परिवहन विभागाकडे तक्रार केली तर संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. पण प्रत्यक्षात प्रवासी तक्रार करत नसल्याने कारवाई करण्यात अडचण येते. त्यामुळे कोणी रिक्षाचालक नियमाचा भंग करत असेल तर त्वरित वाहन विभागाशी संपर्क साधावा.
- गजानन ठोंबरे, सहाय्यक परिवहन अधिकारी, पनवेल
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ृृृ------------------------------
प्रवाशाने जर मीटरप्रमाणे भाडे द्यायचा हट्ट केला तर आम्ही त्याच्याशी जास्त हुज्जत घालत नाही. मीटर चालू करून त्यानुसार भाडे आकारतो. आम्ही कुठल्याही प्रकारे नियमाचा भंग करत नाही.
- अमर फाळके, रिक्षाचालक, कळंबोली