कर्मचारी पदोन्नतीचा प्रस्ताव धूळखात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी पदोन्नतीचा प्रस्ताव धूळखात
कर्मचारी पदोन्नतीचा प्रस्ताव धूळखात

कर्मचारी पदोन्नतीचा प्रस्ताव धूळखात

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई तालुक्यातील चार नगरपरिषदा व ५३ ग्रामपंचायती मिळून महापालिकेची २००९ ला स्थापना झाली होती. तत्कालीन ग्रामपंचायत व नगर परिषदा महानगरपालिकेत समाविष्ट करतानाच तेथील कर्मचाऱ्यांची सेवाही महापालिकेत वर्ग करण्यात आली. त्यानुसार तत्कालिन नगर परिषदांतील ८०७ व तत्कालीन ग्रामपंचायतींमधील ४०८ कर्मचारी अशा एकूण १२१५ कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेत समावेशन झाले. १२ वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायती, नगर परिषदांतून पालिकेत कार्यरत झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली नाही.
याप्रकरणी आस्थापना विभागाच्या उपायुक्तांपासून इतर अधिकाऱ्यांविरोधात आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी मात्र भयाची भूमिका घेतल्याने कर्मचाऱ्यांना वाली कोण, असा प्रश्न कर्मचारी विचारू लागले आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याने उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांची चौकशी करून त्यांना निलंबित केले जावे, अशी मागणी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
९ सप्टेंबर २०१४ मध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत महानगरपालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजूर झालेला आहे. या आकृतिबंधानुसार २८५२ पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतरही स्थायी स्वरूपातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत आस्थापना विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा त्यादृष्टीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशा लागलेल्या आहेत; मात्र चौकशी अधिकारी असलेल्या उपायुक्त-अतिरिक्त आयुक्तांकडून जाणीवपूर्वक या चौकशा प्रलंबित ठेवण्यात येत असल्याने या अधिकाऱ्यांविरोधात पालिकेतील अन्य कनिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांत संतापाची भावना आहे.
----------------------------------------

कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी आणि इतर विषयांवर तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत गंभीर दखल घेणयात आली आहे. आढावा घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका