इन्स्टाग्रामवर महिलेसोबतची मैत्री पडली महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्स्टाग्रामवर महिलेसोबतची मैत्री पडली महागात
इन्स्टाग्रामवर महिलेसोबतची मैत्री पडली महागात

इन्स्टाग्रामवर महिलेसोबतची मैत्री पडली महागात

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : इन्स्टाग्रामवर अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. अमेरिकेतील कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास खूप मोठा आर्थिक फायदा होईल, असे प्रलोभन दाखवून त्या महिलेने त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

५६ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापक उलवेमध्ये राहण्यास असून ऑगस्टमध्ये एका महिलेने इंग्लंडमधील ॲवा जुडिला असल्याचे भासवून त्यांच्यासोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली होती. त्यानंतर महिलेने चॅटिंग करत अमेरिकेतील यूएसए एअरब्रेक्स इन्व्हेस्टमेंट कंपनीची माहिती देत २० हजार डॉलर गुंतवल्यास एका महिन्याला १ कोटी ४० लाख रुपये मिळतात, असे प्रलोभन दाखविले. त्यानुसार महिलेने दिलेल्या बँक खात्यात त्यांनी १६ लाख रुपये पाठवून दिल्यानंतर दोघे मिळून गुंतवणूक करण्याचा बहाणा करून आणखी ३० हजार डॉलर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सदर गुंतवणुकीमध्ये दर दिवसाला १० टक्के परतावा मिळेल, असे तिने सांगितल्यानंतर प्राध्यापकांनी सदर रक्कम भरली. त्यानंतर तिने एअरब्रेक्स साईटवर प्राध्यापकाच्या खात्यात १ लाख ७५ हजार डॉलर (१ कोटी ४० लाख रुपये) जमा झाल्याचे दाखविले. मात्र ११,७५० डॉलर दंड भरल्यानंतर ती रक्कम काढून घेता येईल, असे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकाने दंड स्वरूपात काही लाखांची रक्कम तिने दिलेल्या बँक खात्यात पाठवून दिली. मात्र तिने काही रक्कम परत न केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.