नवी मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य
नवी मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य

नवी मुंबईत स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य

sakal_logo
By

वाशी, ता. ६ (बातमीदार) ः नवी मुंबईतील कोपरखैरणेत इमारत कोसळल्यामुळे एकाचा जीव गेला होता. ठाणे, मुंबईतही अशा प्रकारच्या दुर्घटना एकापाठोपाठ एक झाल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य केले आहे.
महापालिकेने २०२२-२३ सालासाठी केलेल्या सर्वेक्षणात एकूण ५१४ धोकादायक इमारती आढळल्या आहेत. त्यामुळे अशा इमारतींच्या मालकांना अथवा रहिवाशांना महापालिकेकडे नोंदणी केलेल्या अभियंत्यांकडून किंवा स्ट्रक्चरल ऑडिटरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले त्या दिवसापासून ३० वर्षांपेक्षा जास्त काळ मोजावयाचा आहे. स्ट्रक्चरल ऑडिटरने शिफारस केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे आणि बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करायचे आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत दुरुस्तीचा अहवाल महापालिकेचे संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहायक संचालक नगररचना यांच्याकडे सादर करायचा आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनीअर यांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
------------------------------
महापालिकेच्या आवाहनाला अल्पप्रतिसाद
धोकादायक इमारत दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी संभवते. त्यामुळे नागरिकांनी अशा इमारतीमधील वापर त्वरित थांबवावा; अन्यथा एखादी दुर्घटनेनंतर होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी वापरकर्त्यावर राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तरीदेखील महापालिकेच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता रहिवाशांमध्ये दिसत आहे.
------------------------------
नाही तर २५ हजारांचा दंड
धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांनी २५ हजार रुपये दंड भरायची तयारी ठेवावी. नियमानुसार महापालिका २५ हजार रुपये किंवा मालमत्ता कराची रक्कम यापैकी जास्त असलेली रक्कम दंड म्हणून आकारते.