मुंबई सेंट्रल आगाराचे वेळापत्रक कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई सेंट्रल आगाराचे वेळापत्रक कोलमडले
मुंबई सेंट्रल आगाराचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई सेंट्रल आगाराचे वेळापत्रक कोलमडले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील आगाराची प्रवासी सेवा विस्कळित झाल्याचे दिसत आहे. बसला उशीर होत असल्याने एका प्रवाशाने बसपुढे रस्त्यावर झोपून निषेध केल्याची घटना नुकतीच रत्नागिरी येथे घडली. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. मुंबई विभागातील एकूण सर्वच आगारातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत मुंबई सेंट्रल आगाराचे आगारप्रमुख गुलाब बच्छाव यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पांगारी येथे सकाळी ११ः३० वाजता जाणारी बस वेळेत न निघाल्याने एका प्रवाशाने बसपुढे झोपून निषेध नोंदवल्याची घटना नुकतीच घडली. बसला उशीर होण्यासारख्या घटना नित्यनियमाने घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. बसेसची संख्या घटल्याने नियमित प्रवासी सेवा देण्यासाठी अडचणी येत आहेत. मार्गस्थ असलेल्या बसेससुद्धा उशिराने आगारात पोहचत असून, आगारातून सुटणाऱ्या बसेससुद्धा उशिराने धावत आहे. यामध्ये दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या बसेसचे वेळेत कामे होत नसल्याने बऱ्याच वेळा फेऱ्या रद्द करण्याची वेळ आगार व्यवस्थापकांवर येत आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल आगारातील कोकण, मराठवाडा, नाशिक, पुणे धावणाऱ्या गाड्यांना लेटमार्क लागतो आहे.
-------------
डबल ड्युटीकडे कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ
मुंबई सेंट्रल आगारातून विविध जिल्ह्यांत एसटी सेवा धावतात. त्यासाठी एक नियत पूर्ण करून आल्यानंतर दुसऱ्या नियत म्हणजेच डबल ड्युटीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो; मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी आता डबल ड्युटीकडे पाठ फिरवली आहे. ड्युटीवर जाण्यापेक्षा आगारातील प्रतीक्षालयात आराम करण्याचा आनंद एसटी कर्मचारी घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.