Mumbai : पालिका अभियंत्यासह ठेकेदारावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai
भिवंडी पालिकेच्या अभियंत्यासह ठेकेदारावर गुन्हा

Mumbai : पालिका अभियंत्यासह ठेकेदारावर गुन्हा

भिवंडी : नारपोली भागातील अजमेरनगर येथे गटाराचे झाकण न बसवल्याने त्यामध्ये दीड वर्षाचा मुलगा पडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी नारपोली पोलिस ठाण्यात भिवंडी पालिकेच्या अभियंत्यासह ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे; मात्र अभियंत्याचे नाव स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या बांधकाम विभागात अनागोंदी काम सुरू असून अनेक ठिकाणी नगरसेवक ठेकेदार बनून गटारे बांधत आहेत; तर अनेक बांधकामाच्या ठिकाणी पालिकेचे अभियंताही फिरकत नाहीत. त्यामुळे शहराचे नियोजन नसल्याचे पदोपदी जाणवत आहे. प्रथमेश कमलेश यादव (वय १८ महिने) हा मुलगा अजमेरनगरातील माऊली झेरॉक्स व स्टेशनरी दुकानासमोरील गटारात २३ ऑक्टोबर रोजी पडून त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी त्याचे वडील कमलेश कृष्णकुमार यादव यांनी नारपोली पोलिस ठाण्यात ठेकेदार मुक्तादिर बुबेरे व सबठेकेदार प्रवीण सूर्यराव यांच्यासह कनिष्ठ अभियंता प्रभाग समिती क्र. ३ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या घरासमोर गटाराचे बांधकाम झाल्यानंतर आरसीसी चेंबरवर लादी न बसवल्याने त्यात पडून काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. ठेकेदारास दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची जाणीव करून देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे कमलेश यादव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.