महाराष्ट्रातील नाट्यगृहांची डागडुजी लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील नाट्यगृहांची डागडुजी लवकरच
महाराष्ट्रातील नाट्यगृहांची डागडुजी लवकरच

महाराष्ट्रातील नाट्यगृहांची डागडुजी लवकरच

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : महाराष्ट्रातील ५१ नाट्यगृहांची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांच्या डागडुजीचे आणि दुरुस्तीचे काम सरकार लवकरच करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रशांत दामले यांच्या नाटकांचा १२,५०० वा प्रयोग आज (ता. ६) माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील नाट्यगृहांच्या परिस्थितीबद्दल सांगितले. त्यांची डागडुजी करणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विभागीय अधिकाऱ्याची नेमणूक करून, सर्व्हे करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. १२,५०० प्रयोग करून आज प्रशांत दामले यांनी इतिहास रचला आहे, असे म्हणत शिंदे यांनी दामलेंचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, अभिनेते दिलीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ५३० वा प्रयोग रंगला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन प्रशांत दामले यांचा सन्मान करण्यात आला. प्रशांत दामले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.

---
इतिहासात दामलेंचे नाव
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज प्रशांत दामले यांनी १२,५०० प्रयोग करत इतिहास रचला. मराठी नाट्यसृष्टी ज्या प्रकारे विष्णुदास भावे यांच्या नावाने ओळखली जाते त्याच प्रकारे भविष्यात मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात विष्णुदास भावेंप्रमाणेच प्रशांत दामले यांचे देखील नाव आवर्जून घेतले जाईल हे निश्चित. कलेची अविरतपणे सेवा करणाऱ्या प्रशांत दामले यांचे आणखी २५,००० प्रयोग होवोत, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, असे फडणवीस म्हणाले.
-----
कलाकारांची दखल घेतली जात नाही ः ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, आज या १२,५०० प्रयोगांची सरासरी वेळ पाहता प्रशांत दामले यांनी आपल्या आयुष्यातील जवळपास १,५६२ दिवस रंगभूमीची सेवा केली. मुख्य म्हणजे एवढी वर्षे आपल्या चेहऱ्यावरील कुतूहल जपणे खूप अवघड असते; परंतु ते त्यांनी अतिशय प्रभावीपणे निभावले, यासाठी त्यांचे विशेष कौतुक. आपण या कलाकारांच्या कलेत गुंतून राहतो. त्यामुळेच आपण वाईट विचारांपासून दूर राहिलो आहोत; परंतु दुर्दैवाने त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही.
-----
मला आज या क्षेत्रात ३९ वर्षे झाली. आतापर्यंत चांगली संहिता, चांगले सहकलाकार, चांगले तंत्रज्ञ असलेली नाटके मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे. त्यामुळे मराठी नाटके बघायला प्रेक्षक निश्चित येतात.
- प्रशांत दामले
--
पद्मश्री दामले!
प्रेक्षकांनी या वेळी प्रशांत दामले यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा असे सुचवले. ही बाब सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे यांनी उपस्थित मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही यापूर्वीच त्यांचे नाव सुचवले आहे.