विक्रमगड विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस
विक्रमगड विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

विक्रमगड विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना विभागाने २० ते २५ वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन प्रस्तावित जमीन वापर व सार्वजनिक सुविधांची आरक्षणे दर्शविणारा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याबाबत शासनाने स्थानिक रहिवाशांच्या, तसेच बाधित होणाऱ्या नागरिकांच्या हरकती मागविल्या आहेत. विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रातील ४६९ बाधितांनी हरकती नोंदविल्या आहेत.
विक्रमगड नगरपंचायत क्षेत्राचा विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणात खाजगी जमिनीतून नव्याने रस्ते प्रस्तावित केले आहेत. यामुळे येथील दोनशेहून अधिक जमीनमालक बाधित होणार आहेत; तर तीनशेहून अधिक लहान-मोठे व्यापारी बाधित होणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांत ४६९ नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात नगरपंचायत प्रशासनाकडे नोंदवल्या आहेत.
विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात यशवंतनगर, टोपलेपाडा, गबाळे पाडा, नवापाडा, ब्राह्मणपाडा असे आठ ते दहा पाड्यांचा समावेश आहे. मुख्य शहरापासून या पाड्यांमध्ये जाण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले रस्ते हे तीन ते साडेतीन मीटर रुंदीचे आहेत. या विकास आराखड्यात हे सर्व रस्ते १२ मीटर रुंदीचे दाखविण्यात आले आहेत. या इतक्या मोठ्या प्रमाणावर रुंदीच्या रस्त्यासाठी खाजगी जमीन संपादित करावी लागणार आहे.
......
स्थानिकांचा तीव्र विरोध
विकास आराखड्यात ११ ठिकाणी नव्याने उद्याने व ६५ लहान, मोठे रस्ते प्रस्तावित केले आहेत. या उद्यानांसाठी आणि रस्त्यांसाठी नगरपंचायत मालकीची स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. ही प्रस्तावित उद्याने व रस्ते हे येथील खासगी मालकीच्या जागेतूनच होणार असल्याने या विकास आराखड्याला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
....
नारिकांनी नोंदवलेल्या हरकतींवर विचारविनिमय करूनच अंतिम विकास आराखडा मंजूर करण्यात येईल.
- नीलेश पडवले, नगराध्यक्ष, नगरपंचायत विक्रमगड