ठाण्यात रंगणार आयपीलचे सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रंगणार आयपीलचे सामने
ठाण्यात रंगणार आयपीलचे सामने

ठाण्यात रंगणार आयपीलचे सामने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : आयपीएलचा केवळ सरावच नव्हे तर भविष्यात ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्डेडियमवर आयपीएलचे सामनेही रंगणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यासाठी दादोजी कोंडदेव स्डेडियम सज्ज होत असून पुढील वर्षी जानेवारीपर्यंत येथील खेळपट्टी आंतरराष्ट्रीय खेळासाठी खुली होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत सण-उत्सवांसाठी ओळखले जाणारे ठाणे लवकरच क्रिकेट खेळाडूंचे नेक्स्ट डेस्टिनेशन ठरणार आहे.
ठाण्यातील खेळाडूंना हक्काचे क्रीडांगण उपलब्ध व्हावे यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियमची निर्मिती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ क्रिकेटच नव्हे तर अ‍ॅथलेटिक्सचा सरावही या क्रीडांगणावर होत आहे, पण येथे १९८६ मध्ये रणजी करंडक सामनेही झाले होते. त्यानंतर काही कारणाने येथे क्रिक्रेटचे सामने झाले नाहीत. ही संधी तब्बल ३५ वर्षांनी बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीच्या माध्यमाने मिळाली. गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी सामने रंगल्यानंतर बीसीसीआयची नजर या स्टेडियमवर आयपीएलसाठी गेली आणि खेळाडूंच्या सरावाला येथे सुरुवात झाली. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शिरकाव झालेल्या कोरोनानंतर जास्तीत जास्त सामने भारतातच खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. त्यासाठी बीसीसीआयने मुंबई आणि परिसरातील ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईचे डी. वाय. पाटील, तसेच ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमला पसंती दिली होती.

२३ कोटींचा खर्च
गेल्या वेळी झालेल्या आयपीएल सामन्यासाठी संघाने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सरावही केला होता. त्यामुळे येथे आयपीएलचे नव्हे तर इतर क्रिकेटचे सामने भरवता यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. नगरविकास विभागातून निधीची तरतूद करून त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. डे-नाईट सामने भरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन हजार लक्झचे हायमास्क फ्लड लाईट बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी १८ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. सहा कोटी खर्च करून पत्र्याची शेड बसवण्यात येत आहे. याशिवाय प्रेस बॉक्स बनवण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.

खेळाडूंसाठी पंचतारांकित हॉटेल उपलब्ध
आयपीएलसाठी सराव करायला खेळाडू ठाण्यात यायचे व मुक्कामाला मात्र मुंबई गाठायचे. कारण ठाण्यात एकही पंचतारांकित हॉटेल नव्हते, पण आता प्लॅनेट हॉलिवूड हे पहिले पंचतारांकित हॉटेल ठाण्यात सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हॉटेलचे उद्‌घाटन केल्यानंतर ही बाब बोलून दाखवली. पंचतारांकित हॉटेल उपलब्ध झाल्याने भविष्यात आयपीएल सामनेही ठाण्यात रंगतील, असे ते यावेळी म्हणाले.