कल्याण डोंबिवलीत रस्ते कामांना महिनाभरात सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीत रस्ते कामांना महिनाभरात सुरुवात
कल्याण डोंबिवलीत रस्ते कामांना महिनाभरात सुरुवात

कल्याण डोंबिवलीत रस्ते कामांना महिनाभरात सुरुवात

sakal_logo
By

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवलीमधील ३१ रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएने ३६० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २८.५० कोटींची सात रस्त्याची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पार पडली असून त्याची लवकरच वर्क ऑर्डर निघणार आहे. साधारण महिनाभरात या सातही रस्त्यांच्या कामास पालिका प्रशासनाच्या वतीने सुरुवात करण्यात येणार आहे. ही कामे झाल्यास पुढील वर्षी शहरात चांगले रस्ते पाहायला मिळतील, अशी आशा कल्याण- डोंबिवलीकर व्‍यक्‍त करत आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. त्यातच पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. खराब रस्त्यावरून केडीएमसी प्रशासनाला कायम टीकेचे धनी व्हावे लागले आहे. शहराबाहेरील कलाकार, राजकीय नेत्यांनी येथील रस्त्यांच्‍या स्‍थितीवर टीका केल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. कोरोना काळातील विलंबामुळे पालिका प्रशासनाला रस्त्यांच्या देखभालीकडे लक्ष देता आले नाही. शिवाय पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रस्त्यांची कामे करायची कशी, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. केडीएमसीची आर्थिक व्यवस्था बिकट असल्याने रस्ते विकासासाठी एमएमआरडीएने निधी द्यावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार एमएमआरडीएने शहरातील ३१ रस्त्यांच्या कामासाठी ३६० कोटीचा निधी; तर एमआयडीसीतील रस्त्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर केला. निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. तरी प्रत्यक्षात कामांना हवी तशी सुरुवात झालेली दिसत नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातही नागरिकांना खराब रस्त्यांचा सामना करावा लागला. अखेर पावसाने उघडीप दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याचे चांगलेच मनावर घेतले असल्याचे दिसते.
सात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणचे काम
नुकतेच पालिका प्रशासनाने शहरातील एकूण ३८५ किलोमीटर डांबरी रस्त्यांपैकी सुमारे १४५ किमी रस्त्यांवर खड्डे पडले होते. हे खड्डे बुजवत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्यांचा आनंद घेता येत आहे. त्यातच आता महिनाभरात पालिका प्रशासन सात रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणचे काम हाती घेणार आहे.
----------------------
३१ रस्त्यांची कामे
३६० कोटी निधीअंतर्गत शहरातील एकूण ३१ रस्त्यांची कामे होणार आहेत. यातील सात रस्त्यांच्या कामाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतली आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करत पालिकेने ते मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवले होते. त्याला एमएमआरडीएची मंजुरी मिळाली, परंतु पुढील तांत्रिक तपासणी करण्यात पालिकेचा वेळ गेल्याने या कामास विलंब झाला होता. आता या कामांची तपासणी, निविदा प्रक्रिया पार पडली आहे. येत्या तीन आठवड्यांत काम सुरू करण्याची वर्क ऑर्डर काढून महिनाभरात कामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
------------------------
कोट
एमएमआरडीएच्या वतीने शहरातील ३१ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील सात रस्त्यांची कामे ही पालिका प्रशासनाच्या वतीने होत आहेत. त्यासाठी २८ कोटीचा निधी मंजूर आहे. निविदा प्रक्रिया पार पडली असून येत्या महिनाभरात वर्क ऑर्डर निघून सातही रस्त्यांच्या कामास सुरुवात होईल.
- अर्जुन अहिरे, शहर अभियंता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
----------------------------