बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवाशी हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवाशी हैराण
बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवाशी हैराण

बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रवाशी हैराण

sakal_logo
By

बेशिस्तीमुळे कोंडीचे विघ्न
नवीन पनवेलमध्ये रिक्षाचालकांकडून नियम धाब्यावर
नितीन देशमुख ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ७ : पनवेल रेल्वे स्थानकाच्या नवीन पनवेल परिसरातील रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे वांरवार उल्लंघन होत आहे. या रिक्षाचालकांकडून होणारी अरेरावीची भाषा, गणवेश परिधान करण्याकडे होत असलेली टाळाटाळ, मीटरने भाडे न आकारणे, हुल्लडबाजीमुळे प्रवासी त्रस्त असून प्रवाशांच्या तक्रारीनंतरही वाहतूक विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला सिडकोने वसवलेली नवीन पनवेल वसाहत आहे. या वसाहतींमध्ये जाण्यासाठी रिक्षाचा प्रवास करावा लागतो. शेजारीच विचुंबे, सुकापूर, आदई, नेरे, आकुर्ली आदी गावांपर्यंत जाण्यासाठीही इतर पर्यायी व्यवस्था नसल्याने रिक्षानेच प्रवास करावा लागतो. या मार्गांवर गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. रिक्षाचालकांना हव्या असलेल्या भाड्याने प्रवासी तयार असतील तर सेवा मिळते. सध्यस्थितीत विचुंबे, सुकापूर, उसर्ली, नेरे या मार्गांवर १५ ते ३० रुपये असे शेअर भाडे आकारले जात आहे, परंतु हे भाडे आकारतानाही रिक्षाचालकांकडून नियमाने तीनऐवजी चार ते पाच प्रवासी बसवले जातात. जोपर्यंत चार किंवा पाच प्रवासी बसत नाहीत, तोपर्यंत रिक्षा स्टँडवरून निघत नाही. याबाबत कोणत्या प्रवाशाने रिक्षा चालकाला जाब विचारल्यानंतर प्रवाशासोबत दादागिरी करून मारहाणीपर्यंत मजल जात असल्याने तोंड बंद ठेवून जुलमी लूट सहन करावी लागत आहे.
--------------------------------
रस्त्यावरच दुहेरी रांगा
नवीन पनवेलच्या बाजूला पनवेल रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक विभाग आणि प्रादेशिक कार्यालयातर्फे रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यासाठी जागा नेमून दिल्या आहेत. कुठे रिक्षा उभी करावी, प्रवासी बसवावेत असे सर्व काही नियोजन केले आहे, परंतु तरीसुद्धा बहुतांश रिक्षाचालक स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर दुहेरी रांग करून उभे असतात. पर्यायी विचुंबे, अभ्युदय बँकेचा मार्ग, सीकेटी शाळेकडे जाणारा मार्ग हे सर्व मार्ग वाहनांच्या रांगा लागून बंद पडतात.
------------------------------
गणवेशाचा विसर
वाहतूक नियमांनुसार रिक्षाचालकांना स्वतःचा बॅच, परमिट कागदपत्रे, मालक असेल तर पांढऱ्या रंगाचे अथवा भाडोत्री असल्यास खाकी वर्दी परिधान करणे अनिवार्य आहे, परंतु बहुतांश रिक्षाचालक या नियमांप्रमाणे गणवेश घालत नाहीत. त्यामुळे रिक्षाचालकांची नेमकी ओळख प्रवाशांना होत नसल्याने गुन्हेगारांना त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता प्रवाशांकडून वर्तवण्यात येत आहे.
--------------------------------
खराब दर्जाचे मीटर
पनवेल आरटीओ कार्यालयाने मंजुरी दिलेल्या मीटरचा दर्जा खराब असल्याच्या तक्रारी बऱ्याच रिक्षाचालकांनी केल्या आहेत. शहरात फिरणाऱ्या ८० टक्के रिक्षाचालकांचे मीटर खराब दर्जाचे असल्याचे रिक्षाचालक सांगतात. मीटर दुरुस्तीवर प्रत्येक वेळी एक हजार रुपयांचा फटका बसत असल्याचे चालकांकडून सांगण्यात येत आहे.
----------------------------------
हद्दीचा वाद
पनवेल स्थानकाच्या नवीन पनवेल बाजूच्या रिक्षाचालकांनी आपापल्या हद्दी निश्चित केल्या आहेत. या हद्दींना कायद्याने कुठलीही मान्यता नसतानाही अनेक जण त्याचे काटेकोरपणे पालन करतात. नवीन पनवेलहून दुसरीकडे जाणाऱ्या रिक्षाचालकांना त्या ठिकाणचे भाडे घेता येत नसल्याने अनेक जण प्रवाशांकडून जादाचे भाडे आकारतात, असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
-------------------------------
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने प्रवाशांच्या मागणीमुळे प्रयत्न करून विचुंब्याला जाणारी बस सुरू केली होती. रिक्षा संघटनांनी राजकारण्यांना हाताशी धरून ही सेवा बंद केली. त्यामुळे एकाच घरातले दोघे-तिघे असल्यावर रिक्षा परवडत नसल्याने चालत जावे लागते.
- प्रकाश विचारे, अध्यक्ष, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ
----------------------------------------
पनवेल महापालिका हद्दीत मिनीडोअर चालतात. नियमाप्रमाणे त्या तीन कि.मी.बाहेर चालल्या पाहिजेत. त्या बंद केल्याशिवाय मीटरप्रमाणे रिक्षा चालणे शक्य नाही. कारण ते शेअरप्रमाणे आमचे प्रवासी घेऊन जातात. अनेक ठिकाणी प्रवाशांच्या मागणीप्रमाणे आम्ही भाडे कमी केले आहे.
- विजय दुंदरेकर, अध्यक्ष, वंदे मातरम रिक्षा संघटना
-------------------------------
नवीन पनवेल स्टेशनजवळ बेकायदा रिक्षा स्टॅण्डबाबत आमच्याकडे तक्रार आल्यावर सध्या दररोज एक उपनिरीक्षक व चार पोलिस त्या ठिकाणी ठेवले आहेत. वाहतूक पोलिसांची दोन पथके पेट्रोलिंगसाठी नेमली आहेत.
- संजय नाळे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा