मेट्रो कारशेडवर एक हजाराहून अधिक हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो कारशेडवर एक हजाराहून अधिक हरकती
मेट्रो कारशेडवर एक हजाराहून अधिक हरकती

मेट्रो कारशेडवर एक हजाराहून अधिक हरकती

sakal_logo
By

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : भाईंदरजवळील मोर्वा गावातील नियोजित मेट्रो कारशेडचे विकास आराखड्यात आरक्षण ठेवण्याविरोधात स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून एक हजाराहून अधिक हरकती कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकीकडे कारशेडचे आरक्षण विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यासंदर्भात कोकण विभागाने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या असतानाच दुसरीकडे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात हे आरक्षण दाखविण्यात आले आहे.
मेट्रो कारशेड मोर्वा गावात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या कारशेडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या नियोजित कारशेडची जागा मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात कारशेड डेपो म्हणून आरक्षित करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नगरविकास खात्याकडून नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटिशीवर कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात हरकती-सूचना नोंदवण्याचे नोटिशीत नमूद होते. ही मुदत ७ नोव्हेंबरला संपुष्टात आली. या नोटिशीवर मुर्धा, राई, मोर्वा या गावातील ग्रामस्थांनी वैयक्तिक पातळीवर ११६१ हरकती नोंदवल्या आहेत. तसेच आगरी समाज एकता, गावपंच मंडळ मुर्धा, राई गावपंच मंडळ, श्री राधाकृष्ण मंदिर मोर्वा, भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्था या सामाजिक संस्थांनी हरकती दाखल केल्या आहेत. तसेच काही हरकती ई-मेलद्वारे नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकती दाखल झाल्यानंतर या संदर्भातली सुनावणी घेण्यात येणार आहे.

फेरबदल करण्यासाठी प्रक्रिया
मिरा-भाईंदर महापालिकेच्या आधीच्या विकास आराखड्यानुसार नियोजित कारशेडची जागा अंशत: ना विकास क्षेत्र व अंशत: रहिवास क्षेत्रात मोडते. ही जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करण्याबाबत एमएमआरडीएने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारला पत्र लिहिले होते. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर पुणे येथील नगररचना विभागाच्या संचालकांचे मत विचारात घेतल्यानंतर किरकोळ बदलांसह ही जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित करणे व त्यासाठीची आवश्यक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे राज्य सरकारचे मत झाले आहे. त्यामुळे हे फेरबदल करण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

नोटीस केवळ दिखावाच का?
महत्त्वाचे म्हणजे आरक्षणासंदर्भातील नगरविकास विभागाची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात मेट्रो कारशेडचे आरक्षण अगोदरच दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेली आरक्षण टाकण्यासंदर्भातील नोटीस केवळ एक दिखावाच होता का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.