फुंडे खाडीपुलामुळे यातना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुंडे खाडीपुलामुळे यातना
फुंडे खाडीपुलामुळे यातना

फुंडे खाडीपुलामुळे यातना

sakal_logo
By

उरण,ता.७ (वार्ताहर)ः तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या उरण पनवेल राज्य महामार्ग ५४ वरील फुंडे सिडको बस स्टॉप जवळील पूल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी चारही गावातील ग्रामपंचायतींनी केली होती. त्या अनुषंगाने पुलावरील खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी सिडकोने कोट्यवधीचा खर्चही केला आहे. मात्र, पुलाची दुरूस्ती झाली नसल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल खूला करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पनवेल उरण मुख्य रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीमधील दिरंगाईमुळे बोकडविरा, फुंडे, डोंगरी व पाणजे या चार गावातील हजारो नागरिक व विद्यार्थ्यांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या मागणीसाठी सिडको कार्यालयात अनेक बैठका, अर्ज, निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. त्यामुळे तो दुरुस्तीसाठी सिडकोकडे हस्तांतरित करण्याची गरज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिडको कार्यालयात पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्याची पूर्तता होत नसल्याने हा पूल आजतागायत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. उरण पनवेल मार्गावरील खाडीपूल नादुरुस्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहनांसाठी हाइट गेट लावले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणारी सार्वजनिक बस सेवा बंद असल्याने चारही गावातील नागरीकांना पाच किलोमीटरचे अंतर रिक्षा किंवा खासगी वाहनाने पार करावे लागत आहे.
---------------------------------
१४ पेक्षा अधिक वाहनांना अपघात
या गेटमुळे आतापर्यंत १४ पेक्षा अधिक वाहनांना अपघात झाला आहे. याचा फटका उरणमधून रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि आगीच्या घटनेनंतर वेळेत पोहचू न शकणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनांनाही बसत आहे. त्यामुळे आगीच्या घटनांच्या वेळी अग्निशमन दलाची वाहनांना उशीर होत असून उरणमधील नागरिकांच्या रुग्णांच्या जीवालाही धोका वाढला आहे.
--------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता सिडकोला वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची व पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.
-नरेश पवार, उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग