एक राईड तृतीयपंथींच्या सन्मानासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक राईड तृतीयपंथींच्या सन्मानासाठी
एक राईड तृतीयपंथींच्या सन्मानासाठी

एक राईड तृतीयपंथींच्या सन्मानासाठी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाण्यात अनोखी सायकल राईड पार पडली. पोलिस निरीक्षक विनोद लभडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून गडकरी रंगायतन येथून या सायकल राईडला सुरुवात झाली. तलावपाळी-राम मारुती रोड-गोखले रोड-तीन हात नाका यामार्गे निघालेली ही सायकल राईड सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयपर्यंत धावली. यात १० वर्षीय मुलांपासून ६० वर्षांच्या आजीबाईपर्यंत सहभागी झाले होते. माय-लेकी, पिता-पुत्र, गृहिणी, विद्यार्थी यांचा लक्षणीय सहभाग होता.
आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनतर्फे ‘एक राईड तृतीयपंथींसाठी-त्यांच्या सन्मानासाठी’ ही अनोखी सायकल राईड रविवारी झाली. या सायकल राईडमधून सायकलप्रेमींनी त्यांच्याप्रति सन्मान व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद बल्लाळ, सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विश्वस्त मानसी प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, विश्वस्त विकास धनवडे, पत्रकार अक्षय भाटकर, त्याचप्रमाणे संस्थेचे सचिव दीपेश दळवी व्यासपीठावर उपस्थित होते. मुंबईच्या पहिल्या तृतीयपंथी टॅक्सीचालक करिना आडे, किन्नर अस्मिता मंचच्या सदस्य सिमरन सिंग, मुंबई विद्यापीठातील पहिली तृतीयपंथी पदवीधर श्रीदेवी लोंढे यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी त्यांनी आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमच्या हाताला रोजगार द्या, असे आवाहन केले.

.................................
सायकलिंगसाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान
सायकलिंगमध्ये योगदान देणाऱ्या चार जणांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवर प्रवास करणारी ठाण्याची ११ वर्षीय सई पाटील, सायकलवर एक लाख किलोमीटर प्रवास करणाऱ्या डोंबिवलीच्या ममता परदेशी, आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनकडून प्रेरणा घेऊन तब्बल २२ वर्षांनी सायकल चालवणारे पंकज कुंभार आणि वयाच्या ६० व्या वर्षीही सायकल चालविणाऱ्या दुर्गा गोरे यांचा सत्कार करण्यात आला.

.............................
७१ वर्षीय माजी पोलिस अधिकाऱ्याचा गौरव
सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेसचे महत्त्व सांगणाऱ्या ७१ वर्षीय माजी पोलिस अधिकारी प्रवीणकुमार कुलथे यांना संस्थेतर्फे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते ‘कृतार्थ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.