भूमाफियांकडून अवैध उत्‍खनन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूमाफियांकडून अवैध उत्‍खनन
भूमाफियांकडून अवैध उत्‍खनन

भूमाफियांकडून अवैध उत्‍खनन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ७ : निसर्ग सौंदर्य आणि जलवाहतुकीमुळे मुंबई जवळ आल्याने अलिबाग तालुक्यातील जमिनी विकत घेऊन धनिकांकडून भव्यदिव्य इमले बांधण्यात येत आहेत. त्यामुळे येथील जमिनीला भाव गगनाला भिडले असून दगड, मुरूम, मातीलाही सोन्याचा भाव मिळू लागला आहे. बांधकामासाठी दगड-मातीची कमतरता भासू लागल्‍याने भूमाफियांनी डोंगरच्या डोंगर पोखरण्याचा सपाटा लावला आहे. त्‍यामुळे वनराईने नटलेल्या अलिबाग तालुक्‍यातील डोंगर-दर्‌या ओसाड दिसू लागल्‍या असून पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यातील मांडवा, सासवणे, झिराड, थळ या परिसरात धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या आहेत. या ठिकाणी आवडते लॅण्डस्केप तयार करून घेण्यासाठी माती अपुरी पडत आहे. विकत घेऊनही ती उपलब्‍ध होत नसल्‍याने लाल माती, मुरूम यांचे दर प्रति ब्रास ४ हजारपेक्षा जास्त झाले आहे. मातीची शोधाशोध करूनही लाल माती मिळत नसल्याने काही भूमाफियांनी डोंगरच पोखरण्यास सुरुवात केली आहे. म्हात्रोली, बेलपाडा, कनकेश्वर, मापगाव, झिराड परिसरातील डोंगर परिसरात सातत्‍याने माती उत्खनन सुरू आहे. दिवसाला हजारो ब्रास माती काढण्यात येत असल्‍याने डोंगर अक्षरशः ओस पडले आहेत.
अनेक वेळा वनविभाग, गुरचरणाच्या जागांवर डोळा ठेवून स्थानिक पुढाऱ्यांच्या सहकार्याने माती उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, यावर निर्बंध लावण्यात जिल्हा प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. समुद्र किनाऱ्यावर सीआरझेडचे उल्लंघन करून केलेल्या बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला होता. असाच बडगा बेकायदेशीर माती उत्खनन करून आपले फार्महाऊस सजवणाऱ्यांवर करावा, अशी मागणी स्‍थानिक नागरिक करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील गट क्र. १२८ मध्ये घडला असून साधारण ५० ते ५५ हजार ब्रास माती आणि काळा दगड फोडून नेण्यात आला आहे. ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी महसूल विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलाठ्यांनी पंधराशे ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचा पंचनामा केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मवाळ भूमिकेमुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे.

कोट्यवधीची रॉयल्टी बुडीत
मातीचे उत्खनन करून तिचा वापर केल्यास खनिकर्म विभाग प्रति ब्रास ६०० रुपये रॉयल्टी आकारते. परंतु ही रॉयल्टी भरण्यासही भूमाफिया तयार नाहीत. कोणाचेही लक्ष जाणार नाही, अशा डोंगराळ भागातील माती फार्महाऊसच्या सौंदर्यकरणासाठी वापरली जाते. अनेकदा जितकी परवानगी घेतात त्‍यापेक्षा जास्त उत्खनन करूनही संबंधितांवर कारवाई केली जात नाही. यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात आहे.

वनसंपदेला धोका
मातीसाठी डोंगर पोखरले जात असल्याने वनसंपदाही नष्ट होत आहे. डोंगरमाथ्यावरील माती खाली वाहून आणण्यासाठी केलेल्या रस्त्यासाठीही अनेक झाडे तोडली जात असल्‍याने पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. त्याचबरोबर कातळ फोडण्यासाठी सुरूंग स्फोटाचा वापर अनेकवेळा केला जात असल्याच्या तक्रारी स्‍थानिक नागरिक करतात. या स्फोटामुळे घरांना तडे जाणे, खिडकीच्या काचा फुटण्याचेही प्रकार वारंवार घडतात.

तलाठ्यामार्फत बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. किती प्रमाणात माती काढलेली आहे, याचे पंचनामे करून त्यांना दंड आकारला जातो. अलिबाग-मुरूड परिसरात अशा प्रकारे माती उत्खनन करून निसर्गाला हानी पोचवण्याचे काम होत असेल तर नक्कीच दखल घेतली जाईल.
- प्रशांत ढगे, प्रांताधिकारी, अलिबाग

झिराड येथील गट क्रमांक १२८ मधील माती उत्खननाच्या संदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. बेकायदेशीर उत्खननासंदर्भात तलाठी घुमरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पंचनामा करताना १५०० ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचे नमूद केले आहे. वास्तविक ५५ हजार ब्रासचे उत्खनन या एकाच ठिकाणी करून पूर्ण डोंगर गायब करण्यात आला आहे.
- संदेश थळे, तक्रारदार, झिराड

झिराडमध्ये बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. नकाशाप्रमाणे कोणता
सर्वे क्रमांक आहे ते निश्चित होत नाही, जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला असून साधारण एक हजारपेक्षा जास्त ब्रास मातीचे उत्खनन झाले आहे. याप्रकरणी गावकरी पंचांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- राम घुमरे, तलाठी, सजा झिराड