विव्हिंग गॅलरीला परवानगीचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विव्हिंग गॅलरीला परवानगीचे वेध
विव्हिंग गॅलरीला परवानगीचे वेध

विव्हिंग गॅलरीला परवानगीचे वेध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.७ ः सागरी जैवविविधतेचा अभ्यास, पक्षी निरीक्षण आणि पर्यटन विकासासाठी महापालिकेतर्फे पामबीच मार्गावरील डीपीएस शाळा, टी. एस. चाणक्य मरिन अकादमी आणि वाशीतील सी-शोर परिसरात विव्हिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे. या सुविधेसाठी महापालिकेने कागदोपत्री पाठपुरावा सुरू केला आहे, पण परवानग्या मिळवण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पर्यावरण वाढीची ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई शहराला नैसर्गिकरित्या खाडी परिसर लाभला आहे. बेलापूरपासून ते ऐरोलीच्या खाडीपर्यंत सुमारे १४ किलोमीटर लांबीचा हा खाडीकिनारा आहे. या किनाऱ्यालगत सर्वाधिक परिसर हा कांदळवनांनी व्यापलेला आहे. या कांदळवनांमध्ये विविध जातींच्या आणि प्रजातींची कांदळवने, खारफुटी वने आढळतात. या वनांच्या मुळांशी दुर्मिळ प्रकारातील जीवजंतू वास्तव्य करतात. ते जीवजंतू खाण्यासाठी लाखो मैल प्रवास करणारे फ्लेमिंगो, ऑस्ट्रेलियन डक आदी दुर्मिळ प्रवासी पक्षी येतात. दरवर्षी डीपीएस शाळेजवळील तलाव हा फ्लेमिंगोच्या थव्यांमुळे भरून जातो. दारावे, सारसोळे, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीपर्यंत विखुरलेल्या खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो वास्तव्याला येतात. या पक्ष्यांमुळे नवी मुंबईच्या खाडीकिनारी गुलाबी झालरसारखे दृश्य तयार होते. या सर्व विहंगम दृश्यांचा सर्वांना लाभ घेता यावा, याकरीता महापालिकेतर्फे कांदळवनांच्या ठिकाणी विव्हिंग गॅलरी तयार केली जाणार आहे. या गॅलरीसाठी १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या गॅलरीत जाऊन नागरिकांना पक्षी भ्रमंतीचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला पालिकेतर्फे तीन ठिकाणी ही गॅलरी तयार केली जाणार आहे. मात्र, या गॅलरीकरीता पालिकेला पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळाली नसल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
----------------------------------------
नवी मुंबईत तीन ठिकाणी उभारणी
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर विव्हिंग गॅलरी तयार केल्या जाणार आहेत. गिरगाव चौपाटीवर महापालिकेने तयार केलेल्या काचेच्या विव्हिंग गॅलरीसारखीच वाशीच्या मिनी सी-शोरवर गॅलरी तयार केली जाणार आहे. डीपीएस शाळेच्या पाठीमागे आणि टीएस चाणक्य अकादमीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तिसरी विव्हिंग गॅलरी उभारली जाणार आहे. १२ फूट लांब आणि ४ फूट रुंद गॅलरी असणार आहे. या गॅलरीवर एका वेळी १४ नागरिक उभे राहण्याची क्षमता असणार आहे.
----------------------------------------
शहरातील नागरिकांना कांदळवने आणि पक्षी पाहण्याचा आनंद मिळू शकेल, याकरीता तीन ठिकाणी विव्हिंग गॅलरी तयार केली जाणार आहे. त्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार एमसीझेडएमएची परवानगी लागणार आहे. त्यामुळे पालिकेने परवानगीसाठी पुन्हा कागदपत्रे तयार केली आहेत.
- संजय देसाई, शहर अभियंते, नवी मुंबई महापालिका