बहिणीच्या घरातून २५ लाख चोरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिणीच्या घरातून २५ लाख चोरले
बहिणीच्या घरातून २५ लाख चोरले

बहिणीच्या घरातून २५ लाख चोरले

sakal_logo
By

भाईंदर, ता.७ (बातमीदार): बहिणीच्या घरातील लग्नासाठी ठेवलेल्या पंचवीस लाख रुपयांच्या रकमेसह दागिन्यांची चोरी करणाऱ्‍या भावाला मिरा रोड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे. आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरा रोड मध्ये राहणाऱ्या तरन्नुम खान यांच्या घरात लग्न असल्याने त्यांनी घरात पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. या रकमेसह सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातून चोरीला गेले असल्याची तक्रार पाच नोव्हेंबरला खान यांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात दाखल केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. पोलिसांनी फिर्यादीकडे अधिक चौकशी केल्यानंतर तसेच घटनास्थळी केलेल्या तांत्रिक तपास केल्यानंतर पोलिसांचा संशय खान यांचा भाऊ फरमान जावेद खान याच्यावर बळावला. फरमान हा मुंबईतील मालाड येथे मालवणी भागात रहातो. त्याच्या घराच्या आसपास चौकशी केल्यानंतर तो पत्नी व मुलासह निघून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तीन तपास पथके स्थापन करून फरमानचा शोध सुरू केला.
रेल्वे स्थानकात माहिती घेतली असता फरमान गुजरातच्या दिशेने पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा वापी, वलसाड, सुरत याठिकाणी शोध घेतला. त्यात तो सहा नोव्हेंबरला वलसाड येथे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याच्याकडून २५ लाख २४ हजार ५०० रुपयांचा चोरलेला ऐवज व सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.