रेती उपसा मजूरांची उपासमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेती उपसा मजूरांची उपासमार
रेती उपसा मजूरांची उपासमार

रेती उपसा मजूरांची उपासमार

sakal_logo
By

खर्डी, ता. ८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील भातसा, मोडकसागर व तानसा धरण क्षेत्रातून दर वर्षी लाखो रुपयांची रेती चोरून चढ्या भावाने तालुक्यात विकली जाते. त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सरकारचा महसूल वाढविण्यासाठी तालुक्यातील धरण क्षेत्रातील जागेत रेती काढण्यासाठी लिलाव करून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सरकारने या धरण क्षेत्राचा सर्व्हे करून येथील रेतीचोरावर अंकुश ठेवण्यासाठी अधिकृतपणे रेती लिलाव करण्याची मागणी जोर धरत आहे.

पर्यावरणाला धोका असल्याने नदीपात्रातील रेतीउपसा करण्यास गेल्या १२ वर्षांपासून सरकारने बंदी घातली. शहापूर तालुक्यात असणाऱ्या धरण क्षेत्राच्या पात्रात बोटीच्या सहाय्याने चोरून रेती काढण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ झाली असून याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेती काढणाऱ्यांचा लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने ते बेरोजगार झाले असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. धरण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रेतीचा अधिकृतपणे परवाना मिळाल्यास येथील स्थानिक बेरोजगार रेती व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतील. शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा व मोडकसागर (वैतरणा) ही धरणे असून धरणालगत असणाऱ्या जरंडी, बांदलवाडी, वेळूक-वाशाळे, अंबिवली, अजनुप, टेंभा, अघई येथील धरण क्षेत्रातून रेती काढण्यासाठी लिलाव करून येथील मजुरांना व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील मजुरांकडून जोर धरू लागली आहे.
----------------------
रेतीमाफियांना सुगीचे दिवस
रेतीउपशावर सरकारने बंदी घातल्याने बांधकाम व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम झाला असून घर, इमारत बांधताना रेती मिळत नसल्याने कामे ठप्प झाली आहेत. काही कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहेत. रेतीला कुठलीही रॉयल्टी नसल्याने रेतीमाफियांना सुगीचे दिवस आले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
------------------------------------ ----------- ------------- ----
सरकारने परिसरात असणाऱ्या रेतीच्या स्रोतांचा लिलाव करावा, जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण होईल व सरकारच्या महसुलात वाढ होईल.
- विनायक सापळे, समाजसेवक