न्यास नोंदणी कार्यालयाची कोंडवाऱ्यातून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यास नोंदणी कार्यालयाची कोंडवाऱ्यातून सुटका
न्यास नोंदणी कार्यालयाची कोंडवाऱ्यातून सुटका

न्यास नोंदणी कार्यालयाची कोंडवाऱ्यातून सुटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : गेली ३२ वर्षे ठाणे-पालघरमधील हजारो संस्थांची नोंदणी करणारे आणि त्यांचे वर्षानुवर्षे बाड सांभाळणाऱ्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची अखेर कोंडवाड्यातून सुटका होणार आहे. छोट्या आणि कोंदट जागेत असलेल्या या कार्यालयासाठी श्री राम मारुती मार्ग येथील वारकरी भवन असलेल्या भव्य इमारतीत भाडेपट्ट्याने जागा मिळाली आहे. तब्बल ६०९० चौरस फूट चटई क्षेत्र असलेली ही जागा सर्व सुविधांनी युक्त असून हवेशीर आणि मोकळी आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यांत हजारो नोंदणीकृत सार्वजनिक संस्था, मंडळे आणि ट्रस्ट असून गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ या संस्थांची टेंभी नाका येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी होत आहे. या कार्यालयात रोज शेकडो संस्था पदाधिकाऱ्यांची ये-जा होत असते. दोनतीन मजल्यांमध्ये हे कार्यालय विभागलेली जागा अत्यंत अपुरी आणि कोंदट असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न भेडसावत असून त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. दुसरीकडे येथे येणाऱ्या नागरिकांनाही सुविधांअभावी समस्यांना तोंड द्यावे लागत होते. एकूणच मागील पिढीने अनुभवलेल्या समस्या नवीन पिढीही अनुभवत आहे. त्यांच्या तक्रारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून आमदार संजय केळकर यांनी हा प्रश्न धसास लावला. गेली चार वर्षे त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
लवकरच स्थलांतर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी-न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार-चर्चा करून श्री राम मारुती मार्ग येथील वारकरी भवन असलेल्या भव्य इमारतीत न्यास नोंदणी कार्यालयाला भाडेपट्ट्याने जागा मिळवून दिली. तब्बल ६०९० चौरस फूट चटई क्षेत्र असलेली ही जागा सर्व सुविधांनी युक्त असून हवेशीर आणि मोकळी आहे. आमदार केळकर हे एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी या नवीन जागेत आवश्यक फर्निचर आणि साहित्यासाठी २६ लाख ५० हजार रुपयांचा निधीही मंजूर करवून घेतला आहे. लवकरच जुने कार्यालय या नवीन जागेत स्थलांतरित होणार आहे.