एसटीच्या आगप्रकरणी तीन सदस्यीय समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या आगप्रकरणी 
तीन सदस्यीय समिती
एसटीच्या आगप्रकरणी तीन सदस्यीय समिती

एसटीच्या आगप्रकरणी तीन सदस्यीय समिती

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसगाड्यांना आग लागण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता एसटी महामंडळाने तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली. गेल्या काही दिवसांत एसटी बसगाड्यांना लागलेल्या आगींच्या घटनांची ही समिती चौकशी करेल आणि ११ नोव्हेंबरपर्यंत अहवाल व्यवस्थापकीय संचालकांकडे सादर करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या महिन्यात नाशिकच्या सप्तशृंगी गडानजीक एसटी बसने पेट घेतला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली; तर अमरावती-नागपूर महामार्गावरही एक बस जळून खाक झाली. दरम्यान, एसटी बसगाड्यांची वेळोवेळी फिटनेस तपासणी, तांत्रिक तपासण्या केल्या जात असून अनफिट बसगाड्या रस्त्यावर उतरवल्या जात नसल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून वेळोवेळी केला जातो; मात्र तरीही बसगाड्यांना आग लागण्याच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनांमुळे एसटी प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांचे नेमके कारण काय, बसगाड्यांमध्ये कोणता बिघाड झाला, वर्कशॉपमध्ये देखभाल-दुरुस्ती केली जाते का, वाहनांची कालमर्यादा किती होती, कर्मचाऱ्यांच्या काही चुका होत्या का, याबाबत तीन सदस्यीय समिती तपास करणार आहे. या समितीच्या अहवालानंतर बसगाड्यांना आग लागण्याचे ठोस कारण पुढे येईल, अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
-----------
दोषींवर कारवाईची शक्यता
तीन सदस्यीय समितीच्या अहवालात मानवी दोष आढळल्यास त्याबाबतही स्पष्टता होणार आहे. त्यामुळे दुर्लक्षित आणि कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून संबंधितांवरही कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.