नवनीत राणांवर कारवाईला उशीर का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवनीत राणांवर कारवाईला उशीर का?
नवनीत राणांवर कारवाईला उशीर का?

नवनीत राणांवर कारवाईला उशीर का?

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बोगस जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची कारवाई अद्याप मुलुंड पोलिसांनी न केल्याबद्दल शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. राणा राज्यातच आहेत, मग कारवाईला उशीर का, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.
राणा यांनी राखीव गटातून निवडणूक लढवण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून बनावट जात प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप मुंबई पोलिसांनी ठेवला आहे. पोलिसांनी याबाबत मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्रही दाखल केले आहे. न्यायालयात आता यामध्ये आरोप निश्चित करण्यात येणार आहेत; मात्र राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने सप्टेंबरमध्ये अजामीनपात्र वॉरंट बजावण्याचे आदेश दिले होते, परंतु आज पुन्हा मुलुंड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी अवधी मागितला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन का होत नाही, आरोपी महाराष्ट्रात आहेत, राणा यांच्यावर कारवाई का केली जात नाही, कशासाठी विलंब करत आहात, असे प्रश्न न्यायालयाने केले. न्यायालयाने पोलिसांना अधिक कालावधी मंजूर करण्यास नकार दिला. तसेच याबाबत पोलिस आयुक्तांना आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
---