पिवळी खोर रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिवळी खोर रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक
पिवळी खोर रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

पिवळी खोर रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक

sakal_logo
By

आसनगाव, ता. ८ (बातमीदार) : पिवळी खोर रस्त्यावर डांबरीकरण न करता केवळ खडी पसरवल्याने दुचाकीस्वारांसाठी दररोजची अडचण ठरत आहे. संबंधित ठेकेदाराने डांबराऐवजी रस्त्यावर खडी पसरवल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पिवळी परिसरात ३० ते ४० घरे असलेली खोर आदिवासीबहुल वाडी आहे. या परिसरातील बहुतेक तरुणांना रोजगारासाठी भिवंडी, शहापूर परिसरातील वेअर हाऊसमध्ये जावे लागते. हे अंतर लांब असल्याने खासगी वाहनाशिवाय येथील नागरिकांना पर्याय नाही. त्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बहुतेक तरुण कर्ज घेऊन दुचाकी खरेदी करतात. तसेच येथील नागरिकांना दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठीसुद्धा वासिंद, पच्छापूर, अघईसारख्या बाजारपेठेत जावे लागत असल्याने खडीयुक्त रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना जीवघेणा ठरत आहे.
सदर रस्त्याचे नूतनीकरण होऊन सहा महिनेदेखील उलटले नसून रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यात ठिकठिकाणी रस्ताच वाहून गेल्याचे दिसून येत आहे; तर या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याचे दिसुन येते. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूची साईडपट्टीच गायब झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

...................................
दर रविवारी पर्यावरणप्रेमींची रेलचेल
ऐतिहासिक माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी खोर गाव आहे. या गावातून एक वाट किल्यावरील कल्याण दरवाज्याकडे जाते. तसेच गिर्यारोहकांना आकर्षित करणारा नवरा, नवरी, भटजी आणि वजीर सुळक्याकडे जाणारी वाट येथूनच जात असल्याने प्रत्येक साप्ताहिक सुट्टीला येथे पर्यावरणप्रेमींची रेलचेल असते. त्यात बहुतेक जण स्पोर्ट्स बाईक घेऊन येतात; परंतु रस्त्यावरील बारीक खडीमुळे दुचाकी घसरून अपघाताचे प्रणाम वाढले आहे.