रिक्षाचालकांच्या अरेरावीने प्रवासी वेठीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांच्या अरेरावीने प्रवासी वेठीस
रिक्षाचालकांच्या अरेरावीने प्रवासी वेठीस

रिक्षाचालकांच्या अरेरावीने प्रवासी वेठीस

sakal_logo
By

अविनाश जगधने : सकाळ वृत्तसेवा
कामोठे, ता. ८ : सार्वजनिक परिवहन सेवेच्या कुचकामी धोरणांमुळे कामोठेतील नागरिकांना प्रवासासाठी रिक्षाचा एकमेव पर्याय उरला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने भाडेआकारणी, बाहेरच्या रिक्षांना मज्जाव करण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच सिडकोने वाऱ्यावर सोडल्यामुळे र्इर्षेला पेटलेल्या भूमिपुत्रांमुळे स्थानिक विरुद्ध उपरे असा वाद निर्माण होत आहे.
खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानक ते कामोठे या मार्गावर स्थानिकांच्या सुमारे ३०० रिक्षा धावतात. प्रवासी वाहतुकीवर रिक्षाचालकांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळे कामोठे शहरात बहुसंख्य नोकरदार वर्गाला बससेवा सुरळीत नसल्याने मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा हा एकमेव पर्याय आहे, पण रात्री उशिरा, सुट्टीच्या दिवशी किंवा मेगा ब्लॉकच्या काळात तुरळक रिक्षा धावत असल्यामुळे मीटरप्रमाणे भाडेआकारणी होत नसल्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत, पण या सर्व विषयावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत असल्यामुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे.
------------------------------------
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़प्रवासी हक्कांची अंमलबजावणी नाही
रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारात नसल्यास लेखी तक्रार करण्याची सूचना प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे; मात्र प्रवासी तक्रार करण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. या प्रकारामुळे कामोठेसह पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये मीटरने रिक्षा धावण्यासाठी अडचण झाली आहे.
-----------------------------------
हात दाखवून रिक्षा थांबत नाही
मुंबई, ठाणे महानगरात हात दाखवून रिक्षा थांबते; मात्र कामोठे शहरात हात दाखवून अपवादाने रिक्षा थांबते. बहुतांश रिक्षा थांब्यावरून निघतात. त्यामुळे प्रवाशांना थांब्याजवळ जावे लागले, दुसरा पर्याय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------------------
सार्वजनिक परिवहन सेवेची कमतरता
कामोठे शहरात पनवेल महापालिकेची सार्वजनिक सेवा नाही. एनएमएमटीच्या बससेवेचा एकमेव आधार मिळाला आहे. रिक्षाचालक विरुद्ध एनएमएमटी यांच्यात प्रवासी वाहतुकीवरून अनेकदा वाद उद्भवले आहेत. पनवेल महापालिकेने बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे.
---------------------------------
ई-रिक्षांना विरोध
ई-रिक्षामुळे प्रवाशांना कमी पैशांत इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र, काही स्थानिक रिक्षाचालकांच्या विरोधामुळे वाद उद्भवले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात, मोक्याच्या नाक्यांवर परजिल्हा, राज्यातील रिक्षाचालकांना प्रवासी वाहतूक करू दिली जात नाही.
----------------------------------------
रिक्षाचालकांची मनमानी कुठे तरी थांबली पाहिजे. मीटरने भाडे घेतले पाहिजे. स्थानिक विरुद्ध उपरे हा भेदभाव मिटला पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- अनिल परब, प्रवासी
---------------------------
मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्थानक जाताना शेअरिंग रिक्षामध्ये चार प्रवासी कोंबतात. प्रवाशांची सुरक्षा कुणी लक्षात घेत नाही. या प्रकारामुळे महिलांची कुचंबणा होते, पण नाइलाजास्तव प्रवास करावा लागत आहे.
- दीपाली जाधव, प्रवासी
---------------------------
सिडकोने स्थानिकांना भूमिहीन केले आहे. मोबदल्यात नोकरी, रोजगार, शिक्षण, प्रशिक्षणापासून दूर ठेवले आहे. बेरोजगार तरुण आज रिक्षा चालवून पोट भरतो आहे. चांगली प्रवासी सेवा देण्यासाठी आमची बांधिलकी आहे, पण सिडकोने भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता केली पाहिजे.
- सदानंद भोईर, कार्याध्यक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटना, कामोठे