प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

प्रीमियर

‘महादेव का गोरखपूर’चे पोस्टर रिलिज...

हिंदी, भोजपुरी आणि दक्षिणात्य भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या उत्तम अभिनयाने घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणजे रवी किशन. रवी किशन यांचे चाहते नेहमीच त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. नुकताच त्यांनी आपल्या आगामी ‘महादेव का गोरखपूर’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले. पोस्टरवर रवी किशन एका साधूच्या वेशात दिसत आहेत.
इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करताना रवीने लिहिले, ‘‘सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या भोजपुरीमधील माझ्या पहिल्या पॅन इंडिया चित्रपटाचे फर्स्ट लुक मोशन पोस्टर शेअर करताना खूप आनंद होत आहे. आता फक्त तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे.’’
राजेश मोहन दिग्दर्शित ‘महादेव का गोरखपूर’ हा मूळ भोजपुरी भाषेतील चित्रपट आहे; परंतु तो भोजपुरीव्यतिरिक्त, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येदेखील प्रदर्शित केला जाईल. नुकतेच याच्या शूटिंगला गोरखपूरपासून सुरुवात झाली असून लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण परदेशातही होणार आहे. हा सिनेमा ऑगस्ट २०२३ पर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

.....................
तीन दशकानंतर जाहिरातीत री-एन्ट्री
टेलिव्हिजन असो किंवा मोठा पडदा. असे कलाकार फार कमी आहेत ज्यांच्या कामगिरीला प्रेक्षकांची नेहमीच दाद मिळत असते. विश्वजित प्रधान हा असाच एक अभिनेता आहे. गेल्या ३० वर्षांपासून त्याने ‘मोहरा’, ‘डुप्लिकेट’, ‘गदर : एक प्रेमकथा’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत. आता तो तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा जाहिरात क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘एक नवीन टाइड’ कमर्शियलमधून तो जाहिरातीत झळकणार आहे. या जाहिरातीचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक शरद कटारिया यांनी केले आहे, ज्यांनी दम लगा के हैशा, सुई धागा : मेड इन इंडिया इत्यादी चित्रपट केले आहेत. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रधान यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कोलगेटची जाहिरात केली होती. आता ते टाईड डिटर्जंटच्या जाहिरातीमध्ये दिसतील.

......................
‘ठरलं तर मग’ मालिकेत जुही गडकरी
आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनी आणखी एक नवी मालिका घेऊन येणार आहे. ती म्हणजे ‘ठरलं तर मग’ यात अभिनेत्री जुई गडकरी ही मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेविषयी सांगताना निर्माते म्हणाले, ‘‘या मालिकेतून प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी नवी गोष्ट आणि नवी पात्रे भेटीला येतील. खऱ्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका असेल. स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून कल्याणीच्या रूपात घराघरात पोहचलेली अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायलीच्या भूमिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन करणार आहे.’’
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. ५ डिसेंबरपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका दररोज प्रसारित केली जाणार आहे.

..................
सुपरमॉडेल गिगी हदिदचा ट्विटरला रामराम
जगप्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदिदने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जाहीर केले की तिने शुक्रवारी तिचे ट्विटरवरचे अकाउंट बंद केले आहे. तिने लिहिले, ‘‘बऱ्याच काळापासून, विशेषतः एलोनच्या नवीन नेतृत्वामुळे लोकांमध्ये द्वेष आणि धर्मांधतेचे अधिकाधिक वादविवाद चालले आहेत आणि ट्विटर हे असे स्थान नाही ज्यात मला या विषयाचा एक भाग व्हायचे आहे.’’ ती तिच्या चाहत्यांसोबत ट्विटरवरून एका दशकाहून अधिक काळ जोडली गेली होती. त्यामुळे चाहते खंत व्यक्त करत आहेत. गिगी हदीदने ट्विटरवर एलोनच्या नवीन नेतृत्वाच्या विरोधात बोलत असताना ट्विटर प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिचे ट्विटर खाते का निष्क्रिय आहे, असे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

..................
चर्चा आलियाच्या मुलीच्या नावाची
सध्या कपूर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण त्यांच्या घरात एक परी जन्माला आली आहे. अभिनेत्री आलिया भटने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलीची प्रकृती उत्तम आहे. रणबीर कपूरदेखील मुलगी झाल्यामुळे खुशीत आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता आलिया आणि रणबीर आपल्या नन्ही परीचे नाव काय ठेवणार याची चर्चा रंगलेली आहे. आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. तोच वर्षभरापूर्वीचा आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी आलियाने सुपर डान्सर ३ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये एका स्पर्धकाने आलियाला विचारले की मुलगी झाली तर मुलीचे नाव काय ठेवणार. आलियाने त्या नावाचे स्पेलिंग सांगितले आणि स्पर्धकाने ते स्पेलिंग चुकीचे म्हटले. त्यानंतर आलियाने अलमा असे नाव सांगितले. अलमा हे सुंदर नाव आहे असे ती म्हणाली. आता ती आपल्या मुलीचे नाव तेच ठेवणार की आणखी काही ठेवणार आहे, हे लवकरच समजेल.