‘पॉट्स शंट’मुळे अवयव प्रत्यारोपण टळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉट्स शंट’मुळे अवयव प्रत्यारोपण टळले
‘पॉट्स शंट’मुळे अवयव प्रत्यारोपण टळले

‘पॉट्स शंट’मुळे अवयव प्रत्यारोपण टळले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतात पहिल्यांदाच करण्यात आलेल्या ‘पॉट्स शंट’ प्रक्रियेमुळे ३६ वर्षीय महिलेचे हृदय व फुप्फुस प्रत्यारोपण टाळण्यात मदत झाली आहे. या रुग्ण महिलेला इडिओपॅथिक पल्मनरी अर्टेरियल हायपरटेन्शनचा त्रास होता. हा एक दुर्मिळ आजार असून यामध्ये मृत्युदर खूप जास्त आहे. यामध्‍ये हृदय बंद पडल्याने अचानक मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्र अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन पॉट्स शंट प्रक्रिया भारतात पहिल्यांदाच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात केली गेली.

३६ वर्षांच्या शिखा गिरधरवाल यांच्यावर अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. फुप्फुसांच्या धमन्यांमध्ये उच्च रक्तदाबामुळे आयपीएएच हा विकार उद्‌भवतो. सर्वसामान्यतः पॉट्स शंट ही प्रक्रिया ओपन कन्व्हेन्शनल सर्जरीमार्फत केली जाते. यामध्ये अधिक जास्त जोखीम असते आणि रुग्णाची तब्येत पूर्ववत होण्यास देखील खूप जास्त वेळ लागतो. मिनीमली इन्व्हेसिव्ह अर्थात शरीरावर कमीत कमी चिरा देऊन ट्रान्सकॅथेटर पद्धतीमध्ये मांडीतील मुख्य रक्तवाहिनी फेमोरल धमनीचा वापर केला जातो. चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे कन्सल्टन्ट डॉ. प्रशांत बोभाटे यांच्या नेतृत्त्‍वाखालील एका विशेष टीमने ही अत्याधुनिक सर्जिकल प्रक्रिया केली.

वारंवार शुद्ध हरपणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे या महिलेला होती. काही मीटर अंतर चालणेदेखील त्यांना शक्य होत नव्हते. तपशीलवार तपासणीनंतर अत्याधुनिक पॉट्स शंट प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेमध्ये फुप्फुसातील व हृदयावरील दाब कमी करण्यासाठी स्टेंट टाकत फुप्फुसातील धमनी (फुप्फुसातील डावी धमनी) आणि शरीरातील मुख्य धमनी (उतरणारी महाधमनी) यांच्यामध्ये रक्तप्रवाहाचा थेट मार्ग तयार केला जातो.

पॉट्स शंट हे खूप जास्त धोकादायक तंत्र आहे. सर्जरी खूप काळजीपूर्वक करावी लागते. डाव्या फुप्फुसातील धमनी आणि उतरणारी महाधमनी यांच्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या स्टेंटची लांबी ठरवण्यात बारीक चूक झाली, तरी रक्तस्राव होऊन प्रक्रिया अयशस्वी होऊ शकते. शंट ज्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण करावयचा आहे त्यांची तपासणी करण्यासाठी टोमोग्राफी अँजिओग्राफीसह प्रक्रिया-पूर्व नियोजन केले जाते. या रुग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.
– डॉ. प्रशांत बोभाटे, कन्सल्टन्ट, चिल्ड्रेन्स हार्ट सेंटर