शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल
शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल

शेतकऱ्यांचा आता भाजीपाला लागवडीकडे कल

sakal_logo
By

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक साधने आणि सुधारित वाणाचे बी-बियाणे यांचा वापर करून या भागातील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळायला लागला आहे. कमी वेळ, कमी कष्टात जास्त नफा देणारी पिके असल्याने भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे.
जव्हार तालुक्यात भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता तालुक्यातील शेतकरी भाजीपाल्यासह वालाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ही लागवड करणाऱ्या भागात नांगरणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे. तालुक्यातील वनवासी, पिंपळशेत, खरोंडा, बाळ कापरा, हाडे, साकूर आदी भागांत भाजीपाला लागवड होते. त्यात वाल, चवळी, तूर, हरभरा अशा पिकांची तसेच कारली, मिरची, वांगी, टोमॅटो, अशा भाजीपाल्याची लागवड शेतकरी करत आहेत. ही लागवड करताना शेतकरी तालुका कृषी अधिकारी व तालुक्यातील सामाजिक संस्थांच्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लागवड करत आहेत. यासाठी शासनाच्या योजनाचा लाभ घेत आहेत. तालुक्यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, की शेतामध्ये आता पाण्याचा चांगला ओलावा असून सध्या पेरणी केल्याने भाजीपाल्याची रोपे चांगली वाढत आहेत. तसेच योग्य वेळी भाजीपाला तयार झाल्याने शेतमालाला भाव चांगल्या प्रकारे मिळत आहे. आम्ही आमच्या भागात सध्या कारल्याचे पीक जास्त घेत आहोत, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
......

आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
योग्य नियोजन आणि काळजी घेतल्यास भाजीपाल्यातून कमी वेळात जास्त नफा मिळतो. तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून बाजारातील उपलब्धता आणि मागणी यानुसार नियोजन करून भाजीपाला पिकवल्यास हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरू शकतो, असे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ातासाभरात भाजी संपते
जव्हार शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत ग्रामीण भागातून स्वच्छ आणि ताजा भाजीपाला दाखल होत असून अवघ्या तासाभरात भाजीपाला संपतो, असे शेतकरी सचिन गावंडा, देविदास पवार यांनी सांगितले.