क्षयरुग निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरुग निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत
क्षयरुग निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत

क्षयरुग निक्षय मित्रांच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : क्षय रुग्णांना उपचारांबरोबरच सकस आहार मिळावा यासाठी निक्षय मित्र योजना राबवण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या रुग्णांना धान्यवाटप करण्याची ही योजना आहे; मात्र त्यासाठी दात्यांनी हात आकडता घेतल्याचे समोर आले आहे. पोषण आहारासाठी ठाणे पालिका क्षेत्रामध्ये चार हजार ८०० रुग्णांनी अर्ज केले असून, आतापर्यंत केवळ ४४० लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यास यश आले आहे.
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत ठाणे शहराने कोरोनाच्या काळातही क्षयरुग्ण शोधण्याची मोहीम सुरू ठेवली होती. याशिवाय उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याची मोहीमही सुरू ठेवण्यात आली आहे. सध्या ठाणे शहरात नऊ हजार सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात टीबीच्या संशयित रुग्णांच्या मोफत चाचण्या केल्या जातात. टीबी असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा रुग्णांवर महापालिकेकडून मोफत उपचार केले जातात. या औषधाची किंमत प्रतिरुग्ण १० लाखांच्या आसपास आहे; मात्र हा संपूर्ण खर्च महापालिका आरोग्य विभाग, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत केला जातो.

रुग्णांना सकस आहाराचे किटवाटप
क्षय रोगाचा उपचार हा सहा महिने चालतो. उपचारांसोबतच या रुग्णांना सकस आहाराची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निक्षय मित्र योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. उपचार सुरू असेपर्यंत रुग्णांच्या खात्यात पाचशे रुपये आणि विविध संस्था, दानशूर व्यक्तींच्या मदतीने रुग्णांना सकस आहाराचे किटवाटप करण्यात येत आहे. यासाठी सोमवारी ठाणे शहर क्षय रोग अधिकारी आणि कोरोना सेलचे हेड डॉ. प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ४४० क्षयरुग्णांना मोफत धान्यवाटप करण्यात आले; मात्र चार हजारांहून अधिक क्षयरुग्ण निक्षय मित्रांच्या अजूनही प्रतीक्षेतच आहेत.

हवा मदतीचा हात
योजनेमध्ये आमदार निरंजन डावखरे यांनी १८० रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे व इतर दानशूर लोकांनी ३०० रुग्णांना दत्तक घेतले आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण ४,८०० रुग्णांनी पोषक आहारासाठी आपले नाव नोंदवले असून केवळ ४८० रुग्णांना पोषक आहार सहा महिने पुरवण्यात येणार आहे. या निक्षय योजनेमध्ये कोणीही दानशूर व्यक्ती एक रुग्ण सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊ शकते, एका रुग्णासाठी महिन्याला एक हजारप्रमाणे सहा महिन्यांकरिता सहा हजार रुपये खर्च येणार आहे. एक दानशूर व्यक्ती कितीही रुग्ण सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊ शकतो. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.