महामार्गातील बांधणीच्या त्रुटी कधी दुर होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गातील बांधणीच्या त्रुटी कधी दुर होणार?
महामार्गातील बांधणीच्या त्रुटी कधी दुर होणार?

महामार्गातील बांधणीच्या त्रुटी कधी दुर होणार?

sakal_logo
By

मनोर, ता. ८ (बातमीदार) : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील परिस्थितीत बदल झाला नाही. महामार्गातील सदोष रस्तेबांधणी आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याची खंत प्रवासी आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर बोध घेऊन महामार्गाच्या बांधणीतील त्रुटी कधी दर केल्या जातील का, असा सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून केला जात आहे.
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारला चारोटी गावच्या हद्दीतील घोळ येथील सूर्या नदी पुलाच्या कठड्याला धडकून अपघात झाला होता. सायरस मिस्त्री यांचा अपघात रस्त्याचा बांधणीमधील तांत्रिक त्रुटीमुळे झाल्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. रस्तेबांधणीमधील त्रुटी दूर करून महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे महामार्गावर होत असलेल्या अपघातांसाठी त्रुटी निर्माण करणाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली जात आहे. तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या रस्तेबांधणीतील त्रुटी दूर करण्याची मागणी वाहनचाकांकडून केली जात आहे.
महामार्गाच्या बांधणीत अनेक त्रुटी आहेत. मेंढवन खिंडीतील तीव्र वळणे, लेन कमी होत असल्याने अरुंद होणारा महामार्ग, रस्ता दुभाजक कापून अवैधपणे निर्माण केलेले क्रॉसिंग, महामार्गावरील नादुरुस्त तसेच अपघातग्रस्त वाहने, शंभर किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा असलेल्या महामार्गावर पादचारी आणि वाहनांना महामार्ग ओलांडण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपूल आणि फूटओव्हर ब्रिज नसल्याने अपघात घडत आहेत.
......
यामुळे होत आहेत अपघात
चारोटी उड्डाणपूलापासून मुंबईच्या दिशेने दोनशे मीटर अंतरावरच्या घोळ येथील सूर्या नदीवरील पुलाच्या काही मीटर अंतरावर तीन लेन असलेला रस्ता पुल सुरू होताच दोन लेनचा होतो. एक लेन कमी होत असल्याचा कोणताही फलक अथवा सफेद रंगाच्या पट्ट्या पुलाच्या काही मीटर अंतरावर लावण्यात आल्या नव्हत्या. पूल सुरू होण्याआधी डाव्या बाजूची लेन संपत आहे. अवजड वाहने उजव्या बाजूने चालत असल्याने कारसारखी वाहने वाहने डाव्या बाजूने अवजड वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात; परंतु येथे लहान वळण असल्याने अवजड वाहनांमुळे अचानक कमी होणारी लेन चालकांना दिसून येत नसल्याने पुलाच्या ठिकाणी अपघात होतात.
.....
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर अपघातस्थळी सूचना फलक लावण्यात आले. चारोटी उड्डाणपूल आणि घोळ पुलाच्या दरम्यानचे क्रॉसिंग बंद करण्यात आले आहे; परंतु तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची मुदत सहा महिने शिल्लक असल्याने थातूरमातूर काम करून कंत्राटदार निघून जाण्याच्या तयारीत असल्याने महामार्गावरील वाहनचालक आणि प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.
- हरबंस सिंह नन्नाडे, प्रतिनिधी, ऑल इंडिया चालक मालक संघटना

....
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ब्लॅक स्पॉट आणि अपघातांना कारण ठरणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला लेखी स्वरूपात कळवण्यात आले आहे.
- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक,पालघर
.....
महामार्गावर वेगमर्यादा फलक, क्रॉसिंगच्या ठिकाणी रंबलर, सोलर ब्लिनकर लावण्यात आले आहेत. लेन मार्किंगचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन क्रॉसिंग बंद करण्यात आले आहेत. महामार्गावर दहा फूटओव्हर ब्रिज आणि तीन अंडरपास मंजूर झाले आहेत. लवकर कामे सुरू होतील. येत्या काळात महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले बदल दिसून येतील.
- मुकुंद अत्तरदे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण