नादुरुस्‍त बसमुळे प्रवासी त्रस्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नादुरुस्‍त बसमुळे प्रवासी त्रस्‍त
नादुरुस्‍त बसमुळे प्रवासी त्रस्‍त

नादुरुस्‍त बसमुळे प्रवासी त्रस्‍त

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. ८ (बातमीदार) ः सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी बस आधीच खिळखिळ्या झाल्‍या आहेत. त्‍यात देखभाल दुरुस्‍तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्‍याने त्‍या रस्‍त्‍यात बंद पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही दिवसांपासून श्रीवर्धन आगारातील खराब बस सेवेमुळे त्रास सहन करावा लागत असल्‍याने प्रवाशांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
कधी दिघीकडे जाणारी बंद पडणे तर कधी मुंबईकडे जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी होण्याचे प्रकार गेल्‍या काही महिन्यात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी मिरजेहून येणारी लांबपल्ल्याची श्रीवर्धन-मिरज एसटी म्हसळा-बोर्लीपंचतन मार्गावर वरवटने गावाजवळ सायंकाळच्या सुमारास अचानक बंद पडली. बस उतारावर आली असता, मागील चाकाचे नट बोल्ट निखळल्‍याचे लक्षात आले. चालक सतीश वाघमारे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बस बाजूला घेतली आणि मोठा अनर्थ टळला. मिरज ते श्रीवर्धन (एमएच २० बीएल ३२२१) बसमध्ये त्‍या वेळी १४ जण प्रवासी होते.
श्रीवर्धन तालुक्‍यातील मुख्य रस्‍त्‍यांसह अंतर्गत रस्‍त्‍यांची अनेक ठिकाणी दुरवस्‍था झाली आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकदा अपघात होतात. तर काहीवेळा उतारावर बस अनियंत्रित झाल्‍यानेही अपघात झाल्‍याचे समोर आले आहेत. गेल्‍या आठवड्यात महामंडळाच्या तीन बसमध्ये बिघाड झाल्‍याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली. श्रीवर्धन-दिघी एसटी बंद पडल्याने अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्‍याने नाहक मनस्‍ताप सहन
करावा लागला.

श्रीवर्धन एसटी आगारातील बसच्या तांत्रिक दुरुस्ती साठी अतिरिक्त तंत्रज्ञ पाठवले आहेत. सात आठ दिवसांत बसची देखभाल दुरुस्‍ती होऊन त्‍या सुरळीत धावतील.
- दीपक घोडे, विभाग नियंत्रक, पेण

सकाळच्या तीनही एसटी रद्द
शनिवारी (ता. ५) सकाळी मुंबईत व मिरजला जाणाऱ्या तिन्ही एसटी अचानक रद्द करण्यात आल्‍या. बोर्लीपंचतनवरून काहींचे आगाऊ आरक्षण होते मात्र एसटी रद्द केल्याची त्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. वारंवार बस पडत असल्‍याने अनेकांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवल्‍याचे दिसून येत आहे.

श्रीवर्धन ः मिरज-श्रीवर्धन एसटीचे मागचे चाक निखळले होत.

.................

मुरूड आगाराल नव्या बसची प्रतीक्षा
मुरूड, ता. ८ (बातमीदार) ः मुरूड तालुका पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. याठिकाणी सार्वजनिक वाहतूक म्‍हणून नेहमीच एसटीला पसंती दिली जाते, मात्र गेल्‍या काही दिवसांपासून मुरूड आगारातील एसटी नादुरुस्‍त होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे नवीन बस उपलब्‍ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आगारातून मुंबई, बोरीवली व पुणेबरोबरच औरंगाबाद, धुळे, अहमदनगर, शिर्डी या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. मात्र वर्षोनुवर्षे धावणार्‌या बसची सध्या दुरवस्‍था झाली आहे. महामंडळाकडून नवीन बस उपलब्‍ध करून देण्यात न आल्‍याने आहे त्‍या स्‍थितीतील बस लावण्याशिवाय चालक-वाहकांकडे पर्याय नसल्‍याचे दिसून येत आहे. परिणामी अचानक बस बंद पडल्‍याने प्रवाशांची गैरसोय होते. सोमवारी (ता. ७) मुरूड-मुंबई बस (एमएच१४ बीटी ३०५८) गिअर पडत नसल्‍याने मारुती नाक्याजवळ अचानक बंद पडली. त्‍यानंतर पर्यायी व्यवस्‍था करण्यात दीड लागल्‍याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
आगारातून स्वारगेट बस कधीही वेळेवर सुटत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन बस लवकरात लवकर उपलब्‍ध कराव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे आगार व्यवस्‍थापकांकडे केली आहे.