शाळाबाह्य विद्यार्थी चिंतेचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळाबाह्य विद्यार्थी चिंतेचा विषय
शाळाबाह्य विद्यार्थी चिंतेचा विषय

शाळाबाह्य विद्यार्थी चिंतेचा विषय

sakal_logo
By

पालघर, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये नववीचे वर्ग नसल्यामुळे एक हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी केला आहे. शिकण्याची इच्छा असली, तरी प्रवेशाअभावी व वर्गच नसल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहत आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.
या सभेत काशिनाथ चौधरी यांनी स्थायी समिती सभा व सर्वसाधारण सभेमध्ये वारंवार शाळाबाह्य मुलांची माहिती मागवल्यानंतरही प्रशासन माहिती देत नाही, ही खंत असल्याचे म्हटले. सभेमध्ये ही माहिती मागवल्यानंतर माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणे, हे पालघर जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मुलींचे असून हे सर्व विद्यार्थी गोरगरीब आदिवासी कुटुंबातले आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.
या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, सर्व विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे व जिल्हा परिषदेचे सदस्य व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

..............................
रक्तपेढी लवकरच कार्यान्वित
दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिर घेण्याची मागणी केली होती; मात्र आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणेही कठीण होत आहे. वारंवार रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. रक्तपेढीचे काम पूर्ण झाले असून लवकरच रक्तपेढी कार्यान्वित करण्यात होईल, असे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

...................................
१५ एमएलडी पाण्याला मंजुरी द्यावी
मुंबई महानगर विकास प्राधिकरणांतर्गत मिरा-भाईंदर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये ४४ गावांसाठी १५ एमएलडी पाणी आरक्षित केल्याने त्याला मंजुरी द्यावी, असा विषय सभेत आला. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

..................................
पेसाअंतर्गत आलेला निधी वापरा
पेसाअंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीला जो निधी येतो तो वापरला जात नाही. त्यामुळे विकासात्मक कामास खीळ बसली आहे. तो निधी न वापरणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई केली पाहिजे. पैसा न वापरल्याने तो परत जातो आणि त्याचा फटका मात्र जिल्हा परिषदेला बसतो, असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला.