वसई विरारला स्पर्धेसाठी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरारला स्पर्धेसाठी झळाळी
वसई विरारला स्पर्धेसाठी झळाळी

वसई विरारला स्पर्धेसाठी झळाळी

sakal_logo
By

वसई, ता. ८ (बातमीदार) : वसई विरार शहराचा विकासाच्या दृष्टीने कायापालट करण्यासाठी महापालिकेने नव्या योजना राबवत पावले उचलली आहे. यात शहर स्वच्छ व सुंदर कसे दिसेल यावर भर दिला जाणार असल्याने वसई विरारला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. महापालिका राज्यस्तरीय शहर सौदर्यींकरण आणि शहर स्वच्छता २०२२ या स्पर्धेत सहभागी होत अव्वल स्थान पटकावण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार नागरिकांना मूलभूत सुविधा व नव्या योजना प्रशासनाकडून आखल्या जातात. लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचना देखील अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना काळापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे शहरातील जबाबदारी प्रशासक सांभाळत आहेत. अशातच उद्यान सुशोभीकरण, उड्डाणपूल, नवे मार्ग, चौक यासह विविध कामे केली जात आहेत. तर राज्य सरकारच्या शहर सौदर्यींकरण आणि शहर स्वच्छता २०२२ या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील उड्डाणपुलांना रंगरंगोटी, तलाव, उद्यान सुशोभीकरण, मुख्य रस्त्यांना संस्कृतीचा साज, वृक्ष संवर्धन व संगोपन, ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण असे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. याचबरोबर महापालिकेच्या प्रभागीय कार्यालयांना देखील नवे रूप मिळणार असून इमारती सुशोभित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
.....
कचरा वर्गीकरणासाठी धोरण
कचरा वर्गीकरणात येणारे अपयश पाहता महापालिकेने यासाठी देखील धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार झोपडपट्टी भाग स्वच्छ करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण यावर भर दिला जाणार आहे. स्पर्धेत उतरण्यासाठी जनजागृती देखील केली जाणार आहे.
------
सातत्याची गरज
महापालिकेला कचरा भूमीवर कचऱ्याचे शात्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यश आले नाही. त्यामुळे याबाबत प्रदूषण विभागाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील निकष पूर्ण करण्यासाठीची धडपड केवळ त्या मर्यादित कालावधीत न ठेवता यात सातत्याची गरज आहे.
------
वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात स्वच्छतेकडे व सुंदरतेकडे लक्ष घालण्यात आले असून राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत विविध उपाययोजना करून स्वच्छता व सौदर्यीकरण केले जाणार आहे. स्पर्धेपुरते नव्हे तर पुढेही स्वच्छतेवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे.
- अनिल कुमार पवार, प्रशासक, महापालिका