गोखले पूल लष्कराकडून बांधून घ्यावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले पूल लष्कराकडून बांधून घ्यावा!
गोखले पूल लष्कराकडून बांधून घ्यावा!

गोखले पूल लष्कराकडून बांधून घ्यावा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : अंधेरीतील गोखले पुलाचे काम नेहमीच्या निविदा प्रक्रियेच्या फेऱ्यांमध्ये न अडकवता युद्धपातळीवर करावे, अशी मागणी स्थानिक पातळीवर जोर धरू लागली आहे. एल्फिन्स्टन ब्रिजसारखेच युद्धपातळीवर काम करण्यासाठी गोखले पुलाची दुरुस्ती लष्कराकडे देण्यात यावी. एखाद्या अनुभवी तज्ज्ञ कंपनीकडून पुलाचे काम करून तो लवकरात लवकर सुरू करावा, असे पर्याय स्थानिकांनी सुचवले आहेत.

दरम्यान, पुलाच्या एका मार्गिकेची वाहतूक येत्या सहा महिन्यांमध्ये म्हणजे मान्सूनपूर्वी सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे मुंबई महापालिकेतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

एल्फिन्स्टन ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या मदतीने अवघ्या तीन महिन्यांत नवा पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला. गोखले पुलासाठीच्या पर्यायांचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या पाहता इथेही अशाच पद्धतीने नियोजनबद्ध विचार व्हायला हवा. तसे झाले तर पूल लवकरात लवकर वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो, असा मुद्दा स्थानिकांनी मांडला आहे.

मेट्रोसाठी प्री कास्ट गर्डर कारखान्यात तयार करून टाकता येऊ शकतो. तशाच पद्धतीने अंधेरीवासीयांना दिलासा देण्यासाठी पालिकेने तातडीने काम करायला हवे. निविदा, वर्क ऑर्डर, बांधकामासाठी लागणारा प्रत्यक्ष वेळ आणि विविध परवानग्यांसारख्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कालावधीच्या तुलनेत युद्धपातळीवर काम होण्याची सध्या गरज आहे. त्यामुळेच पालिका आणि रेल्वेनेही तातडीने काम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवासी करत आहेत.

आमदारांना मागणीचे पत्र देणार
गोखले पुलाचे काम युद्धपातळीवर व्हावे म्हणून आम्ही ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार हजार जणांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे. पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर प्रतिनिधींचे शिष्टमंडळ स्थानिक आमदारांना मागणीचे पत्र देणार आहे. पालिकेच्या स्थानिक पातळीवरील प्रभाग अधिकाऱ्यांनाही पत्र देण्यात येणार आहे, असे अंधेरी लोखंडवाला सिटीझन असोसिएशनचे धवल शाह यांनी सांगितले.