समर्थन मिळूनही वाईन धोरणाची रखडपट्टी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थन मिळूनही वाईन धोरणाची रखडपट्टी!
समर्थन मिळूनही वाईन धोरणाची रखडपट्टी!

समर्थन मिळूनही वाईन धोरणाची रखडपट्टी!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : सार्वजनिक ठिकाणी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला, परंतु या निर्णयाला विरोधकांकडून टीका होऊ लागल्याने राज्यातील नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये वाईन धोरणाच्या बाजूने सर्वाधिक समर्थन असतानाही फडणवीस-शिंदे सरकारकडून अद्याप वाईन धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत आहे. नुकतीच वाईन उत्पादकांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांबरोबर बैठक झाली, परंतु यातही कोणताच मार्ग निघत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री धोरणासंदर्भात नागरिकांनी सर्वाधिक समर्थन दर्शवले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे राज्यभरातून हरकती प्राप्त झाल्या. ज्यामध्ये ४७३४ नागरिकांनी वाईन धोरणाच्या विरोधात, ६९६८ नागरिकांनी धोरणाच्या समर्थनार्थ हरकती नोंदवल्या असून, अशा एकूण ११७०२ हरकती सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्राप्त झाल्या. तरीही वाईन धोरणाची अंमलबजावणी रखडल्याने वाईन उत्पादकांची दिवाळीपूर्वी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांशी बैठक पार पडली.

बैठकीत कोरोना काळात बंद केलेला व्हॅट परतावा सुरू करावा, द्राक्षांपासून बनवण्यात येणाऱ्या ब्रॅन्डीमध्ये २ ऐवजी २० टक्के अल्कोहोलचे प्रमाण करण्यात यावे, वाईन धोरणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या केल्याचे वाईन उत्पादक असोसिएशनचे जगदीश होळकर यांनी सांगितले.