शिवडी टीबी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी टीबी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही
शिवडी टीबी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही

शिवडी टीबी रुग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : कोविड साथीपासून मुंबई महापालिकेच्या सर्वांत मोठ्या शिवडी टीबी रुग्णालयात लहान मुलांवर उपचारांसाठी एकही बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. बदली केलेले एकही डॉक्टर येथे कर्तव्यासाठी तयार होत नसल्याची दुसरी बाजूही यात उघडकीस आली आहे. यासंदर्भात टीबी रुग्णालयात सर्व प्रमुख रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुखांची उद्या (ता. ९) बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत लहान मुलांसाठी ‘पिडियाट्रिक वॉर्ड’ सुरू करण्याबाबत चर्चा होणार आहे.

सध्या रुग्णालयात १६ वर्षांवरील टीबी रुग्णांवर उपचार केले जातात; मात्र १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. टीबीग्रस्त बालरुग्णांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते. सलाईन लावण्यासाठीही सराव केलेले बालरोगतज्ज्ञ लागतात. शिवाय त्यांना दिले जाणारे औषधाचे डोसही वेगळे असतात. बालरोगतज्ज्ञच उपलब्ध होत नसल्याने अशा रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जाते. २०२० नंतर एकही बालरोगतज्ज्ञ नसल्याने येथे आशेने येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होते.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात ‘पिडियाट्रिक वॉर्ड’ सुरू करावा, अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. त्यासाठी २४ तास बालरोगतज्ज्ञ लागणार असून यासंदर्भात प्रस्तावही तयार केला आहे. त्यावर उद्या होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता आहे.

५६ खाटांच्या वॉर्डची तयारी
रुग्णालय प्रशासनाने पिडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून, वॉर्ड १ मध्ये एकूण ५६ खाटा आहेत. यातही एमडीआर म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्ण आणि सामान्य टीबी रुग्ण असे दोन प्रकारच्या वेगळ्या खाटा तयार केल्या जातील. म्हणजेच एका वॉर्डमध्ये २८ ते ३० खाटा असतील. लहान मुलांसाठी खाटांची सुविधा, बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती, त्यांना लागणारी औषधे या सर्व बाबींवर चर्चा केली जाणार आहे.

डॉक्टरांची टीबी रुग्णालयात बदली झाली, की ते तात्काळ दुसऱ्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रक्रिया करतात. त्यांना संसर्गाची भीती वाटते. ज्याप्रमाणे परिचारिकांना एकाच ठिकाणी अनेक वर्षे सेवा द्यावी लागते, त्याप्रमाणे डॉक्टरांनाही काही नियम असावेत, जेणेकरून रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळतील.
- सचिन पडवळ, माजी नगरसेवक