नवी मुंबईतील पोलिस आयुक्तांच्या बदलीचे वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील पोलिस आयुक्तांच्या बदलीचे वारे
नवी मुंबईतील पोलिस आयुक्तांच्या बदलीचे वारे

नवी मुंबईतील पोलिस आयुक्तांच्या बदलीचे वारे

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : राज्य शासनाने नवी मुंबईतील पाच पोलिस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांनंतर नवी मुंबईतील पोलिस आयुक्तही बदलले जाण्याची चर्चा मंत्रालय स्तरावर सुरू आहे. याकरिता त्या जागेवर पोलिस दलातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गृह खात्यात मनधरणी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, एकाच वेळी नवी मुंबई पोलिसांच्या इतिहासात पाच उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने एकच चर्चा रंगली आहे.

राज्यातील अनेक शहरांतील पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त व अपर पोलिस आयुक्तांचा कार्यकाळ संपल्याने ते बदलीस पात्र झाले आहेत; मात्र काही ठराविक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकमत होत नसल्याने त्यांच्या बदल्या होत नसल्याचे बोलले जात आहे. राज्य शासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा राज्यभरातील शंभरहून अधिक उपायुक्त आणि अधीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे (मिरा-भाईंदर), वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड (मुंबई शहर), विशेष शाखेच्या उपायुक्त रूपाली अंबुरे (ठाणे शहर), परिमंडळ- २ चे उपायुक्त शिवराज पाटील (ठाणे शहर), तसेच मुख्यालयाचे उपायुक्त अभिजित शिवथरे (जालना) यांचा समावेश आहे; तर नवी मुंबईत बदलून येणाऱ्या पोलिस उपायुक्तांमध्ये अमित काळे, पंकज डहाणे, संजय सुरगौडा पाटील व योगेश चव्हाण यांचा समावेश आहे.

दोन पोलिस उपायुक्तांच्या जागा रिक्त
१०४ पोलिस उपायुक्तांच्या झालेल्या बदल्यांपैकी नऊ पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांना स्थगिती देत त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे आदेश राज्य शासनाने मंगळवारी जारी केले आहेत. यामध्ये नवी मुंबईत बदली करण्यात आलेले पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईत दोन पोलिस उपायुक्तांच्या जागा रिक्त राहणार आहेत.

पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त बदलीच्या प्रतिक्षेत
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह, तसेच सह पोलिस आयुक्त डॉ. जय जाधव यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांची नावे संभाव्य बदलीच्या यादीत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत आता पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पोलिस आयुक्त पदासाठी विनय चौबे, देवेन भारती, ब्रिजेश सिंह आणि आशुतोष डुंबरे हे अपर पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी इच्छुक असल्याचे समजते.