सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा
सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा

सार्वजनिक वाहतूक सेवेचा बोजवारा

sakal_logo
By

कल्याण, ता. ९ (बातमीदार) : १० नोव्हेंबर हा जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीबद्दल माहिती होण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात ढिसाळ नियोजनामुळे सरकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याची जागा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी घेतल्याने दोन्ही शहरे वाहतूक कोंडीने बेजार होत चालली आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत हा बकालपणा दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र हे सुमारे ११६.८ चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले आहे. मूलभूत गरजांसोबत सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. पालिकेची केडीएमटी ही प्रवासी वाहतूक सेवा देण्यास अपयशी ठरल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे.
केडीएमटीच्या ताफ्यात १४० हून अधिक बसेस असल्या, तरी रस्त्यावर ९० हून अधिक बसेस काढण्यात यश येत आहे; तसेच ५०० हून अधिक कर्मचारी अधिकारी संख्या आहे. प्रतिदिन पाच लाखाच्या जवळपास केडीएमटीचे उपन्न येत आहे; मात्र इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी आणि कर्मचारी वर्गाचा वेतन आदींचा खर्च आणि जमा जमवण्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
केडीएमटीला भिवंडी, नवी मुंबईमधून सर्वात जास्त उपन्न मिळते. शहरी आणि ग्रामीण भाग तसेच नवी मुंबई परिसरात समांतर प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असल्याने केडीएमटीला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. केडीएमटीकडे १० एसी बसेस असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच इलेक्ट्रॉनिक बसेस ताफ्यात येणार आहे.
कल्याणमध्ये कल्याण एसटी डेपो असून त्यांच्या ताफ्यात ७० हून अधिक बसेस असून राज्यातील विविध शहरात या धावतात. या डेपोच्या आजूबाजूला अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने त्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. शहरी भागात अन्य समांतर प्रवासी वाहतूक सुरू असल्याने केडीएमटीप्रमाणे व्यवसाय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये सरासरी रिक्षाची संख्या ३० हजारहून अधिक झाल्या असून जागोजागी केवळ रिक्षाच दिसतात. प्रवाशांना सेवा देण्यापेक्षा त्यांची अडवणूक करताना रिक्षावाले दिसतात. सरकारी सार्वजनिक वाहतूक सेवा अपयशी ठरल्याने रिक्षाची संख्या वाढली आहे. कोणतीही रिक्षा मीटरने धावत नसून शेअर पद्धतीने भाडे घेतले जाते. कल्याण डोंबिवली शहरात सर्वात जास्त बेशिस्त रिक्षाचालक असल्याचे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईमधून वेळोवेळी उघड झाले आहे.

कल्याण विभागीय वाहतूक कार्यालयात नोंद असलेली प्रवासी वाहन संख्या

१. टुरिस्ट मीटर टॅक्सी - ३,६५१
२. रिक्षा - ५५,०७५
३. स्कूल बस - ३२६
४. रुग्णवाहिका - ५९८