अतिरिक्त आयुक्तांची मनपा कर्मचाऱ्यांना तंबी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त आयुक्तांची मनपा कर्मचाऱ्यांना तंबी
अतिरिक्त आयुक्तांची मनपा कर्मचाऱ्यांना तंबी

अतिरिक्त आयुक्तांची मनपा कर्मचाऱ्यांना तंबी

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी झालेल्या लोकशाही दिनानिमित्त भिवंडी महानगरपालिकेमध्ये एकही अर्ज दाखल न झाल्याने अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी वर्गाचा विभागनिहाय एका बैठकीमार्फत आढावा घेतला. या वेळी कामात दिरगाई करणाऱ्यांना त्यांना चांगलीच तंबी दिली.
त्या वेळी त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले, की आपले सरकार पोर्टल, पंतप्रधान पोर्टल, लोकायुक्त, उप-लोकायुक्त, मानवी हक्क आयोग, माहिती अधिकार व त्यांचे अपील, सेवा हमी, लेखापरीक्षणातील आक्षेप निकाली काढणे, तसेच इतर तक्रारींसंदर्भातील सर्व प्रकारांतील कोणत्याही तक्रारी प्रलंबित ठेवू नये. त्याचबरोबर कार्यालयीन शिस्त न पाळल्यास किंवा कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक शब्दांत इशारा दिला.

उपस्थितांपैकी भविष्यात आपण सर्व सेवानिवृत्त होणार आहोत. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या लोकांची देयके व सेवानिवृत्त होणाऱ्या दिवशीच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपूर्ण देयके कशी अदा करता येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील महिन्यापासून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण देयके त्याच दिवशी अदा करण्याची चोख व्यवस्था, कार्यवाही करावी व त्यांची वणवण थांबवण्यासाठी त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याची महत्त्वाची भूमिका सर्वांनी पार पाडावी. त्यासंदर्भात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी पेन्शन, पे फिक्सेशन हे तातडीने निकाली काढण्यात यावे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

.......................................
थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई करावी
या वेळी महानगरपालिकेकडील मोठ्या प्रमाणावर असलेली मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व संबंधित प्रभाग अधिकारी, करमूल्यांकन विभाग व कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करून मालमत्ता सील करावी. तसेच त्या मालमत्ता महानगरपालिकेच्या नावावर करण्याची कारवाई करून वसुलीमध्ये उच्चांक गाठण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याच्या सूचनाही या वेळेस त्यांनी दिल्या. नागरिकांच्या सेवा-सुविधांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यालय उपायुक्त दीपक पुजारी, आरोग्य उपायुक्त दीपक झिंजाड, प्रभारी उपायुक्त तथा सहायक आयुक्त प्रणाली घोंगे, शिक्षण सहायक आयुक्त अनुराधा बाबर तसेच महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.