स्मार्ट सिटीला स्मार्ट प्रवासाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट सिटीला स्मार्ट प्रवासाची प्रतिक्षा
स्मार्ट सिटीला स्मार्ट प्रवासाची प्रतिक्षा

स्मार्ट सिटीला स्मार्ट प्रवासाची प्रतिक्षा

sakal_logo
By

नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांना इच्छितस्थळी स्वस्तात पोहचवणारी सेवा म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. मग ती रेल्वे असो वा बस. एकीकडे खासगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आणि रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेरसारखे असंख्य पर्याय उपलब्ध असतानाही सर्वसामान्यांची पहिली पसंती ही सार्वजनिक वाहनांनाच मिळत आहे. तरीही ही सेवा गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असून समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. १० नोव्हेंबर हा दिवस सार्वजनिक वाहतूक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ठाण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या स्थितीचा घेतलेला आढावा.


ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : मुंबईच्या वेशीवर असलेले ठाणे शहर. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग शहरातून जात असल्यामुळे दळणवळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे ठाणे शहराच्या मुख्य रस्त्यांवरच नव्हे, तर अंतर्गत मार्गावरही वाहनांची सतत वर्दळ असते. या वर्दळीत अजूनही ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने म्हणजेच टीएमटीने आपली जागा टिकवून ठेवली आहे; मात्र लोकसंख्येच्या तुलनेत टीएमटी बसची संख्या खूपच तोकडी असून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे हे विस्तारले असून लोकसंख्या १८ वरून २१ लाखांवर पोहचली आहे. नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या ठाणेकरांची पहिली पसंती ही रेल्वे असली तरी जवळच्या प्रवासासाठी टीएमटी अधिक सोयीची पडत आहे; मात्र ठाणे परिवहन सेवा आणि बसची संख्या अपुरी असल्याचे जाणवत आहे. ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या अंतर्गत सेवेसाठी एक लाख ठाणेकरांसाठी ३० बसची गरज आहे. त्यानुसार सुमारे ६०० बसची आवश्यकता असताना सध्या परिवहनच्या २४० बस जीसीसी तत्त्वावर आहेत, पालिकेच्या मालकीच्या ८४ अशा ३२४ बस रस्त्यावर धावताहेत. तीन वर्षांपूर्वी बसची ही संख्या ३२५ ते ३५० इतकी होती.

दोन लाख प्रवासी, २५ लाखांचा प्रतिदिन गल्ला
ठाणे परिवहनच्या १५३ बस भंगारात काढल्यानंतर एकंदर ३२४ बस रस्त्यावर धावताहेत; तर या बसमधून तब्बल दोन लाख ठाणेकर प्रवास करत आहेत. त्यामुळे परिवहनला प्रतिदिन २५ लाखांचे महसूल उत्पन्न मिळत आहे. वास्तविक तीन वर्षांपूर्वी ३५० बस रस्त्यावर धावत असतानाही प्रतिदिन २५ लाखांचे उत्‍पन्न होते. त्यानंतर पाचवरून सात रुपये तिकीट दर करण्यात आला, पण उत्पन्नात काही फरक पडला नाही.

१०४ मार्गांवर धावते टीएमटी
ठाणे परिवहन बस या शिळफाटा ते ठाणे स्टेशन, उपवन, शास्त्रीनगर, वागळे, दिवा, अशा विविध १०४ रूटवर धावत आहेत. ठाणे परिवहन सेवेत एक हजार ८२४ कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत; तर परिवहनचे वागळे, मुल्लाबाग, आनंदनगर, कळवा येथे चार डेपो आहेत.

१४३ नव्या बसची प्रतीक्षा
पालिकेला सध्या ठाणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी १४३ नव्या बसची प्रतीक्षा आहे. यात १२३ बस, तर २० सीएनजी बसचा समावेश आहे. सध्या ठाणे परिवहनच्या बस पालिका क्षेत्राबाहेर सेवा पुरवीत नाहीत, तर बसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर मात्र कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, विरार रूटवर धावणार आहेत. ठाणे परिवहनच्या बस चालवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे १०४ नवीन मार्गांवर टीएमटी धावणार आहे.

व्हेअर इज माय बस?
ठाणेकरांचा सुखद प्रवास आणि बसची इत्‍थंभुत माहिती प्रवाशांना मिळावी या उद्देशातून परिवहनने सुरू केलेल्या व्हेअर इज माय बस अ‍ॅपला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला; तर तब्बल पाच हजार ठाणेकर या अ‍ॅपचा लाभ घेत आहेत.

एकूण टीएमटी बससंख्या ३२४
वातानुकूलित- ३०
टीएमटी मार्ग- १०४
प्रवासी संख्या प्रतिदिन- २ लाख
प्रतिदिन उत्पन्न- २५ लाख
प्रतीक्षेतील बस- १४३
वाढीव मार्ग- १०४
रिक्षांची संख्या- २५ हजार
टॅक्सी संख्या- १००
कूल कॅब- ५०
-----------------------
ट्राम, रिंगरूट कागदावर, मेट्रो लांबणीवर
ठाणे शहराच्या विस्ताराबरोबरच ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाची मोठी पंचाईत होती. यासाठी ठाणे महानगरपालिकेने अंतर्गत प्रवासासाठी ट्राम, मिनी ट्रेन, रिंगरूट प्रस्तावित करण्यात आलेल्या होत्या; मात्र याची अंमलबजावणी न झाल्याने हे प्रस्ताव कागदावरच राहिले आहे; तर मुंबई, घोडबंदर ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोचे काम संथगतीने सुरू आहे.
----------------------------------
ठाण्याच्या विकासामुळे विस्तार झपाट्याने झाला; मात्र दळवळणाची व्यवस्थाही तेवढीच आहे. अनेक प्रस्ताव आले, पण अस्तित्वात आलेले नाहीत. ठाणेकरांच्या सेवेसाठी तब्बल २५ हजार रिक्षा रस्त्यावर धावताहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.
- ऋषिकेश पाटील (सदस्य, विजू नाटेकर रिक्षा युनियन)
-----------------
ठाण्यात एकही ट्रक टर्मिनल नाही. वागळे येथे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. ठाण्यात ट्रक टर्मिनलचे अनेक आरक्षण असतानाही त्यांना हक्काचे तळ मिळालेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात ट्रकचे पार्किंग होते.
- विजय यादव (सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कमिटी)
-----------------------------------
ठाणे शहर हे अगदी मुंबई शहराप्रमाणे आहे. प्रवासाची आणि इच्छितस्थळी पोहचण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत; मात्र ते निर्धारित वेळेत असल्याने प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. जवळच्या प्रवासासाठी रिक्षाचालकांचा नकार, अशा कारणांमुळे प्रवासाला विलंब होतो.
- शैला कांबळे (ठाणे शहर प्रवासी)