मासेमारीच्या सुवर्णपट्ट्यावर मत्स्यदुष्काळाचे सावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासेमारीच्या सुवर्णपट्ट्यावर मत्स्यदुष्काळाचे सावट
मासेमारीच्या सुवर्णपट्ट्यावर मत्स्यदुष्काळाचे सावट

मासेमारीच्या सुवर्णपट्ट्यावर मत्स्यदुष्काळाचे सावट

sakal_logo
By

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर, ता. १ : महाराष्ट्राला ७२० किलोमीटर इतका विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. हा भाग मासेमारीसाठी सुवर्णपट्टा म्हणून ओळखला जातो. पापलेट, घोळ, सुरमई अशी खवय्यांची पसंती असलेली मासळी या पट्ट्यात मुबलक सापडते, शिवाय ती निर्यातदेखील होते. पण गेल्या काही वर्षांपासून येथील मासेमारीला ग्रहण लागले आहे. येथील मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्‍यांना ज्याप्रमाणे सरकार मदत करते त्याच पद्धतीने मच्छीमारांनाही सरकारने मदतीचा हात द्यावा, अशा मागण्या मच्छीमारांच्या संघटना करू लागल्या आहेत. वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्‍हास, किनारी प्रदूषण या घटकांसह प्रमाणाबाहेर करण्यात येणारी मासेमारीदेखील या मत्स्य दुष्काळाला कारणीभूत ठरत आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, वसईतील पाचूबंदर, ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबईतील वर्सोवा, रायगडमधील मुरूड, रेवदंडा, करंजा अशा मासेमारीच्या प्रमुख बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बंदरात होते. तसेच निर्यातीद्वारे देशाला परकीय चलनदेखील मिळते, पण गेल्या काही वर्षांपासून मासळीच्या उत्पादनात मोठी घट होऊ लागल्याचा येथील मत्स्यव्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. परिणामी मत्स्य दुष्काळाला कारणीभूत ठरणाऱ्‍या घटकांवर आता चर्चा होऊ लागली आहे.
मासेमारीचे सर्वसाधारणपणे पारंपरिक व आधुनिक असे दोन प्रकार आहेत. पारंपरिक मासेमारी ही सुरक्षित मानली जाते, पण आधुनिक मासेमारी प्रकारात मोडत असलेली ट्रॉलींग, पर्ससीन, लाईन फिशिंग या पद्धतीची मासेमारी ही विनाशकारी प्रकारात मोडत असून समुद्रातील मत्स्य दुष्काळाला ही विनाशकारी मासेमारीच कारणीभूत असल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.

ही मासेमारी धोकादायकच
१ ट्रॉलींग व पर्ससीन मासेमारी प्रकारात समुद्रात जवळपास पाच किलोमीटर परिघात मोठी जाळी टाकण्यात येते. ही महाकाय जाळी थेट समुद्राच्या तळापर्यंत जाते. त्यानंतर ही जाळी यंत्राच्या साह्याने वर ओढली जाते. यात समुद्राचा तळ पूर्णपणे खरवडून काढला जातो व मोठ्या मासळीसोबतच लहान मासळी, त्यांची पिल्ले, मत्स्यबीज तसेच जलसृष्टीला आवश्यक घटक जाळ्यात ओढले जातात. त्याचा थेट परिणाम मासळीच्या उत्पादनावर होत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२ एलईडी पद्धतीची मासेमारी हा एक धोकादायक प्रकार आहे. यात रात्रीच्या अंधारात बोटींवर असलेल्या एलईडी दिव्यांचा प्रखर प्रकाशझोत समुद्रात सोडला जातो. या प्रकाशाकडे मासळी मोठ्या प्रमाणात आकृष्ट होते व नंतर ती जाळ्याच्या साह्याने पकडली जाते.
३ दोरीला असंख्य गळ बांधून देखील मासेमारी केली जात आहे. यात समुद्रात वरच्या थरात पोहोणारे दर्जेदार मासे पकडले जात आहेत. या विनाशकारी मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्यपैदास मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे गुंगीचे रसायन पाण्यात टाकूनदेखील मासेमारी करण्याचा प्रकार होऊ लागला आहे. यात समुद्राचे पर्यावरण धोकादायक तर बनतच आहे.
....
जाळ्यांचे प्रमाण वाढले
पालघर ते उत्तन या पट्ट्यात पाच ते सहा हजार मासेमारी नौका आहेत. पूर्वी पारंपरिक मच्छीमार समुद्रात १३ खुंटे लावून त्याला सहा जाळ्या बांधत असत. पण या जाळ्यांमध्ये आता कमी मासळी मिळू लागली असल्यामुळे आता तीस जाळ्या लावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
.....
उत्पन्नातून ताळमेळ घालण्याचे आव्हान
सागरी किनारे प्रदूषित मत्स्य दुष्काळासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. शहरातील सांडपाणी तसेच कारखान्यांचे रासायनिक पाणी प्रक्रिया न करताच समुद्रामध्ये आणि खाड्यांमध्ये सोडण्यात येत आहे. शिवाय समुद्रकिनाऱ्‍यावरील वाढत्या पर्यटनामुळे समुद्रात प्लास्टिक, अन्य कचरा टाकला जात आहे. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागल्यामुळे मासळी किनाऱ्‍यापासून दूर खोल समुद्रात जाऊ लागली आहे. त्यामुळे मासेमारीचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा मेळ घालणे मच्छीमारांना आव्हानात्मक ठरू लागले आहे.
....
निसर्गाचा लहरीपणा
वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे होणारा अवकाळी पाऊस, समुद्रात वारंवार होणारी वादळे, यामुळे समुद्रात अंतर्गत बदलही होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दर्जेदार मासळी खोल समुद्राकडे जाऊ लागली आहे. अनेक वेळा मच्छीमारांना मासळीच न मिळाल्याने रिकाम्या हाताने किनाऱ्‍याकडे परतावे लागत आहे.
....
मासेमारी बंदीचा कालावधी
पावसाळ्यातील मासेमारी बंदीचा कालावधी हा देखील एक कळीचा मुद्दा ठरत आहे. पूर्वी १५ मे ते १५ ऑगस्ट असा नव्वद दिवसांचा काळ मासेमारीसाठी बंद असायचा; परंतु आता तो कमी करून १ जून ते ३१ जुलै असा साठ दिवसांचा करण्यात आला आहे. मे महिन्यापासून साधारणपणे माशांच्या प्रजननाला सुरुवात होते. त्यामुळे १५ मे पासून मासेमारी बंदीचा काळ योग्य होता, असे मच्छीमार नेत्यांचे म्हणणे आहे; परंतु हा कालावधी १ जूनपर्यंत पुढे गेल्यामुळे या काळात अंडी पोटात असलेले मासे पकडले जातात. एका घोळ माशाच्या पोटात असलेल्या गाभोळीपासून (माशांची अंडी) कोट्यवधी माशांची पैदास होते; परंतु हाच मासा मारला गेला तर कोट्यवधी माशांची पैदास आपोआपच नष्ट होत आहे. पापलेटच्या बाबतीही हीच गोष्ट आहे. या काळात अवघी पाच ते दहा ग्रॅम वजन असलेली पापलेट मासळीची पिल्ले पकडली जातात. त्यामुळे नव्वद दिवसांचा मासेमारी बंदी काळ हा माशांच्या उत्पादन वाढीसाठी सर्वोत्तम काळ असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
.....
मत्स्य दुष्काळावर उपाययोजना काय?
मासेमारी संदर्भातल्या युनोच्या धोरणाचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. युनोने स्मॉल फिशरमेन गाईडलाईन्स अर्थात छोट्या मच्छीमारांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मर्यादित मासेमारीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मासेमारी नौकांची संख्या किती असावी, मच्छीमारांनी किती मासे पकडावेत यासंदर्भात त्यात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन व विनाशकारी मासेमारीवर सरकारकडून तातडीने नियंत्रण या उपाययोजनांद्वारे मासळीच्या दुष्काळावर मात करता येईल, असे नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी सांगितले.
....
पर्ससीन व एलईडी मासेमारीसंदर्भात पारंपरिक मासेमारी व पर्यावरण यावर होणाऱ्‍या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार सरकारी आदेशही जारी झाले आहेत. या आदेशांनुसार पालघरच्या झाई ते रायगडमधील मुरूडपर्यंतच्या पट्ट्यात होणाऱ्‍या पर्ससीन मासेमारीवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. माशांची पैदास वाढवण्यासाठीदेखील समितीने केलेल्या शिफारशींनुसार पूर्वीप्रमाणेच १५ मे ते १५ ऑगस्ट हा मासेमारी बंदीचा कालावधी लागू करणे आवश्यक आहे
- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
......
डहाणू ते उत्तनपर्यंतच्या सागरी पट्ट्यात पर्ससीन व एलईडी मासेमारीवर बंदी आहे. त्यानुसार या पट्ट्यात विनाशकारी मासेमारी फारशी होत नाही. अधूनमधून पर्ससीन व एलईडी पद्धतीची मासेमारी रात्रीच्या वेळी चोरून केली जाते. मात्र त्यावर मत्स्यव्यवसाय विभागाकडून तातडीने कारवाई केली जाते. त्यामुळे या पट्ट्यातील मत्स्य दुष्काळासाठी विनाशकारी मासेमारी फारशी कारणीभूत नाही. मात्र हवामानातील बदल, वादळे, तसेच सागरी किनाऱ्‍यांचे प्रदूषण हे घटक मासळीच्या दुष्काळाला प्रामुख्याने जबाबदार आहेत.
- दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, ठाणे व पालघर जिल्हा
...
धोका काय?
१ विनाशकारी मासेमारीमुळे समुद्रातील मत्स्य पैदास मोठ्या प्रमाणात घटली आहे. दुसरीकडे गुंगीचे रसायन पाण्यात टाकून देखील मासेमारी करण्याचे प्रकार होऊ लागले आहेत.
२ पूर्वी सात ते आठ सागरी मैलांपर्यंत मासेमारी करणारे मच्छीमार आता मासळीच्या शोधात बारा सागरी मैल अंतर ओलांडून पुढे जाऊ लागले आहेत. यात मासेमारीचा खर्च वाढत आहे.
३ मासेमारीच्या एका फेरीसाठी नौकेला लागणारे डिझेल, खलाशांचा पगार, शिधा, इतर साहित्य यावर मच्छीमारांचे लाखो रुपये खर्च होत असतात. पण मासे न पकडताच परत आल्याने हा सर्व खर्च वाया जाऊन मच्छीमारांचे आर्थिक गणितच कोलमडून पडत आहे.

बोटींची संख्या
यांत्रिकी बोटी १८, ३००
बिगर यांत्रिकी ८०००

परंपरा काय?
पूर्वी पारंपरिक मासेमारी करणारे आपल्या गरजेपुरतेच मासे पकडत होते. तसेच माशांच्या प्रजनन काळात मच्छीमारी बंद ठेवत होते. पूर्वीच्या काळात मच्छीमार मासेमारी करताना जर छोटे मासे किंवा पिल्ले जाळ्यात आढळली तर त्यांना ते सोडून देत होते. त्यामुळे माशांचे प्रमाण मुबलक राहण्यात मदत होत होती, अशी माहिती सातपाटी येथील मच्छीमार विनोद पाटील यांनी दिली.