रस्ते कंटेनर कार्यालयांना आंदण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते कंटेनर कार्यालयांना आंदण
रस्ते कंटेनर कार्यालयांना आंदण

रस्ते कंटेनर कार्यालयांना आंदण

sakal_logo
By

विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका हद्दीतील बहुतांश रस्ते फेरीवाले आणि अनधिकृत व्यावसायिकांनी अडवू ठेवले आहेत. उर्वरित जागाही पालिकेने राजकीय पक्ष आणि संलग्न संस्थांच्या कंटेनर कार्यालयांना आंदण दिली आहे. परिणामी सामान्य वाहनांना व नागरिकांना चालण्यासाठी साधा फूटपाथही शिल्लक राहिलेला नाही. विरार पूर्व नाना-नानी पार्कसमोरील रस्त्यावर अशाच एका कंटेनर कार्यालयाने रस्ता अडवल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
वसई-विरार महापालिका ‘ब’ प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या विरार-मनवेल पाडा आणि परिसरात ६० फुटी दुपदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यांवर सध्या अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व तत्सम व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून याविरोधात कारवाई होत नसल्याने फेरीवाले आणि अन्य व्यावसायिकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. हे वाढते अतिक्रमण कमी की काय म्हणून आता या रस्त्यांवर बिनदिक्कत राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांनी सुसज्ज कंटेनर कार्यालये थाटलेली आहेत.
विरार पूर्वेकडील नाना-नानी पार्कसमोरील रस्त्यावर एका संस्थेचे सुसज्ज कंटेनर कार्यालय थाटण्यात आलेले आहे. या रस्त्यावर बँक ऑफ बडोदा, वसई सहकारी बँक, अपना सहकारी बँक व अन्य नामांकित बँका व आस्थापनांची कार्यालये आहेत. त्यामुळे या भागात अनेक सामान्य नागरिक विविध कामानिमित्त दररोज येत असतात; मात्र कंटेनर कार्यालयाने त्यांचा रस्ता अडवल्याने परिसरातील नागरिक आणि बँकांच्या वतीने अनेकदा पालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. पालिकेने या तक्रारींची साधी दखलही घेतली नसल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
====
पालिकेने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कंटेनर कार्यालयाला परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी पाहणी करून त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणार आहे.
- हरिश्चंद्र जाधव, अतिक्रमण अधिकारी, प्रभाग समिती ‘ब’
=====
सामान्य नागरिक रस्ते कर भरतो. शहरात पालिकेची पार्किंगसाठी विशेष व्यवस्था नाही. अशा स्थितीत एखाद्या नागरिकाने रस्त्यात वाहन उभे केले तर पालिका व वाहतूक पोलिस लागलीच कारवाई करतात, पण अशा अनधिकृतपणे उभ्या केलेल्या कंटेनर कार्यालयांवर पालिका अधिकारी कारवाई का करत नाहीत.
- मंगला क्षीरसागर, स्थानिक रहिवासी