मिरा-भाईंदरमधील कचरा संकलन निविदा अडचणित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदरमधील कचरा संकलन निविदा अडचणित
मिरा-भाईंदरमधील कचरा संकलन निविदा अडचणित

मिरा-भाईंदरमधील कचरा संकलन निविदा अडचणित

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी काढलेली कोट्यवधी रुपयांची निविदा अडचणीत आली आहे. कचरा संकलनाचे काम दर वेळी एकाच ठेकेदाराला मिळत असून निविदेमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे निविदा प्रक्रियेची आर्थिक गुन्हे शाखेकडून अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. परिणामी अनेक वर्षे रखडलेली निविदा पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे.
शहरातील दैनंदिन निर्माण होणारा कचरा गोळा करून तो उत्तन येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. वास्तविक कंत्राटदाराची पहिली नियुक्ती २०१२ मध्ये पाच वर्षांसाठी करण्यात आली होती. ही मुदत २०१७ मध्ये संपुष्टात आली; मात्र त्यानंतर आजपर्यंत नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी पाच वर्षांत नऊ वेळा निविदा काढली आहे; पण प्रत्येक वेळी एकतर निविदा भरण्यासाठी कंत्राटदार मिळाला नाही किंवा निविदा प्रक्रियेसंदर्भात तक्रारी झाल्यामुळे प्रक्रियाच रद्द झाली आहे. त्यामुळे आधीच्याच कंत्राटदाराला गेली पाच वर्षे मुदतवाढ मिळत आहे. नियमानुसार एखाद्या कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत केवळ तीन वेळाच मुदतवाढ दिली जाते; पण कचरा संकलन करणाऱ्‍या कंत्राटदाराला तब्बल पाच वर्षे मुदतवाढ मिळत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आता प्रशासनाने पुन्हा एकदा कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; मात्र या निविदा प्रक्रियेवर आमदार प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे. ही निविदा एका विशिष्ट कंत्राटदारालाच मिळावी, यासाठी एक राजकीय नेता प्रयत्नशील आहे. निविदा प्राक्रिया पूर्ण झाली नाही, तर न्यायालयात धाव घेऊन हे काम त्याच कंत्राटदाराला मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या कामात महापालिका अधिकारी, कंत्राटदार व राजकीय नेता यांचे संगनमत आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश
आजपर्यंत या कामासाठी एकच ठेकेदार मिळत आहे. या कंत्राटदाराच्या कामाबाबत अनेक तक्रारी असूनही त्याची चौकशी होत नाही अथवा त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान सरनाईक यांच्या मागणीनंतर कचरा संकलन निविदा प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाकडून महापालिकेला देण्यात आले आहेत.