५१ कोटी २१ लाखांची पाणीपट्टी वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५१ कोटी २१ लाखांची पाणीपट्टी वसूल
५१ कोटी २१ लाखांची पाणीपट्टी वसूल

५१ कोटी २१ लाखांची पाणीपट्टी वसूल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : तळ गाठलेल्या तिजोरीत गंगाजळी जमवण्यासाठी ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीकडे आपली मोहीम वळवली आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांत तब्बल ५१ कोटी २१ लाखांची विक्रमी वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वसुली ३४ टक्क्यांनी अधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली प्रभावीपणे व्हावी, यासाठी प्रभाग समितीनिहाय आढावा घेण्यात येत आहे. या अनुषंगाने १७ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पाणीपट्टी वसुली, थकबाकी याबाबत प्रकर्षाने चर्चा करून आवश्यक उपाययोजना राबवणे व आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आयुक्तपदी आलेल्या अभिजित बांगर यांनी पालिकेची आर्थिक घडी बसवण्यासाठी पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जे मालमत्ता धारक आपली पाणीपट्टी भरण्यास दिरंगाई करीत आहेत, अशां‍वर दिनांक १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या काळात थकबाकी वसुलीची कारवाई करण्यात आली.

कारवाईचा बडगा
पालिकेच्या विशेष मोहिमेत १०४८ मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला; तर १२८ जणांचे मोटरपंप जप्त करून ६३० जणांना नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमध्ये २९ पंपरूम सील करण्यात आले. १५ दिवसांच्या कालावधीत दोन कोटी ९५ लाख इतकी थकबाकी वसूल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता आणि पाणीपुरवठा विभागाचे समन्वय अधिकारी विनोद पवार यांनी दिली.


प्रभागनिहाय वसुली
------------
दिवा- ४ कोटी ३२ लाख ७३ हजार०८५
कळवा- ४ कोटी ५१ लाख ७४ हजार २४४
लोकमान्य-सावरकर- ३ कोटी ७७ लाख ७१ हजर ३४७
माजिवडा-मानपाडा- ८ कोटी ७७ लाख ९४ हजार २११
मुंब्रा- ४ कोटी ५७ लाख ४८ हजार ९७९
नौपाडा-कोपरी- ५ कोटी ९९ लाख ६७ हजार ४२५
उथळसर - ४ कोटी ५९ लाख ८८ हजार ५६१
वर्तकनगर - ४ कोटी ९९ लाख १९ हजार ४८८
वागळे - २ कोटी ७७ लाख २९ हजार ४३१
नागरी सुविधा केंद्र - ६ कोटी ८८ लाख २१ हजार २९५
एकूण - ५१ कोटी २१ लाख ८८ हजार ६६ रुपये