पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले
पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

पालघर जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

sakal_logo
By

मनोर, ता. ९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नुकताच पालघर जिल्ह्यात ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी (ता. ९) जाहीर करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणुकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका यादम्यान घेतल्या जाणार आहेत. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण जाहीर झाले होते. यात पालघर तालुक्यात ३८; तर वसई तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे. अन्य सहा तालुक्यांमध्ये पेसाअंतर्गत ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही.

११ नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करू शकणार आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर केली जाईल; तर ७ डिसेंबरला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून याच दिवशी निवडणूक चिन्ह तसेच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

-----------------
निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
वसई १५
पालघर ३२
तलासरी १
वाडा १५
एकूण ६३